सिंधुदुर्ग Rajkot Fort : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर आज बुधवारी याच किल्ल्यावर जोरदार राजकीय राडा पाहायला मिळालाय. या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर आले होते. मात्र नेमक्या याचवेळी तिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हेदेखील आपल्या समर्थकांसह पोहोचले. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले. तर बघता बघता शाब्दिक चकमक थेट धक्काबुक्की आणि हाणामारी पर्यंत जाऊन पोहचल्याचे बघायला मिळाले.
सुमारे तासभर चललेल्या या राड्यात अनेक कार्यकर्ते आणि पोलीस जखमी झाल्याचेही बघायला मिळाले आहे. मात्र ऐकुणात या राजकीय पक्षाच्या राड्यात शिवरायांच्या किल्ल्याचे दुर्दैवाने मोठे नुकसान झाले आहे. यात तटबंदीचे अनेक दगडी चिरे निखळले असल्याची माहितीही पुढे आली आहे. परिमाणी या प्रकरणाने समाजमन हेलावून गेलं असून शिवभक्तांकडून या घटनेचा तीव्र संताप उमटतांना आता दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत. राज्यात या प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली आहे. अशातच याच घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार, महाविकास आघाडीतील काही नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले. नेमके त्याचवेळी महायुतीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे देखील राजकोट किल्ल्यावर पाहाणी करण्यासाठी दाखल झाले. यावेळी काँग्रेस नेते आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते.
कट्टर विरोधक आमने-सामने
कधीकाळी सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी आमने-सामने आल्यानंतर हस्तांदोलन केलं. महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थकसुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले. मात्र, ठाकरे आणि राणे आमने-सामने आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. नारायण राणे समर्थक आणि विनायक राऊत समर्थक आमने सामने आल्यानं राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग घडला. हा राडा एका बाजूनं सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेसुद्धा पोहोचले. यावेळी पेंग्विन, पेंग्विन अशा घोषणा देण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य ठाकरे कोणतीही प्रतिक्रिया न देता, किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी निघून गेले.
15 मिनिटांत आम्हाला रस्ता खाली करुन द्या
राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर जाऊन देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. पण आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक किल्ल्यावरील एका पायरीवर ठाण मांडून बसले. यावेळी नितेश राणे आणि त्यांचे समर्थक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत होते. त्यावेळी वैभव नाईक यांनी 15 मिनिटांत आम्हाला रस्ता खाली करुन दिला नाही तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. आम्ही आतमध्ये घुसू, असं म्हटलं. यावर राणे समर्थनक आणखीनच संतापले आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
आणखी वाचा