मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी काल मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. केंद्र सरकारच्या लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार ते पाहणार आहेत. नारायण राणे यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं की, सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवलं तरी तरी सुद्धा कोकणातून शिवसेनेला हटवणे हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नातं तोडण्याचं काम कोणीही करू शकत नाही, असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. 


एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त चार मंत्रिपदं मिळतात हेच मोठं दुःख आहे. चार मंत्रिपदं मिळत असताना प्रकाश जावडेकर यांच्या सारखा कार्यक्षम मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर जातो, याचं दुःख फार मोठं असल्याचं विनायक राऊत यावेळी म्हणाले. तसेच मुंबई आणि शिवसेना यांचं जे नातं आहे हे अभेद्य नातं मागच्या 30 वर्षांपासून आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, तो उतरवण्याची ताकद कोणामध्ये नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं.


नारायण राणे यांची केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थकांनी लाडू, पेढे वाटून जल्लोष साजरा केला होता. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडीत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना पाहायला मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यात देखील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी राणे साहेब आगे बढो हम तुमारे साथ है! अशा घोषणा दिल्या. शिवाय फटाके फोडत मिठाईचे वाटप आपला आनंद व्यक्त केला.


इतर संबंधित बातम्या