नवी दिल्ली : मंत्रिमंडळात वर्णी म्हटलं की आधी घराणेशाहीचा दबदबा दिसायचा. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मात्र घराणेशाही ही जमेची बाजू नव्हे तर अडचणीचा मुद्दा बनताना दिसतोय..काही मोजके अपवाद वगळता घराणेशाहीचा प्रभाव दिसणार नाही याची काळजी मोदी सातत्यानं घेत असल्याचं दिसतंय. 

मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या 77 जणांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे. पण ज्योतिरादित्य शिंदे आणि अनुराग ठाकूर ही दोन नावं सोडली तर घराणेशाहीला वाव नाही. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं विश्लेषण करताना हा ही एक महत्वाचा अँगल समोर येतोय. प्रीतम मुंडे, वरुण गांधी, पूनम महाजन यांची नावं चर्चेत होती. पण त्यांच्यापैकी कुणालाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीय..

 काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपमध्ये घराणेशाही नाही असं अजिबात म्हणता येणार नाही..अनेक नेत्यांची मुलं खासदार, आमदार बनली आहेत. पण मोदींनी या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र या घराण्यांचं प्रस्थ वाढू दिलं नाहीय. जिथं शक्य आहे तिथं नव्या नेतृत्वाला वाव दिला गेलाय..अगदी पक्षात आयात लोकांनाही संधी दिली गेलीय. 

 महाराष्ट्राचा विचार केला तर मुंडे-महाजन या दोन घराण्यांचं उदाहरण अगदी ठळक आहे. 2014 साली सत्ता आली तेव्हा गोपीनाथ मुंडे केंद्रात मंत्री झाले. पण त्यांच्या अकस्मित निधनानंतर त्यांच्या घरात किंवा प्रमोद महाजनांच्या घरातही मंत्रीपद दिलं गेलं नाहीय. पंकजा राज्यात मंत्री होत्या, पण दिल्लीत मात्र गेली सात वर्षे सत्ता असूनही या दोन नावांचा विचार मंत्रीपदासाठी झालेला नाहीय. पूनम महाजन यांना राष्ट्रीय युवा मोर्चाची जबाबदारी दिली होती.

नरेंद्र मोदींच्या या विस्ताराचा विचार करताना यूपीएच्या काळात घराणेशाहीचं प्रस्थ कसं वाढलं होतं याचीही तुलना व्हायला हवी. यूपीएच्या काळात सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, जितेन प्रसाद सिंह हे सगळे घराणेशाहीचे चेहरे एकाचवेळी मंत्रिमंडळात समाविष्ट झाले होते. मोदींनी किमान हे अस्तित्व नगण्य राहील इतकी काळजी घेतलीय हे मात्र दिसतंय. 

मोदी सरकारमधील मंत्र्यांची खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विज्ञान, तंत्रज्ञान विभाग देण्यात आले आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर मनसुख मांडवीय हे नवे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत.

  • राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय
  • अमित शाह-  सहकार, गृह मंत्रालय
  • नितीन गडकरी- रस्ते वाहतूक व महामार्ग
  • निर्मला सीतारमण - केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
  • नरेंद्र सिंह तोमर - कृषी व शेतकरी कल्याण
  • मनसुख मांडवीया -  केंद्रीय आरोग्य मंत्रिपद, रसायन आणि खते विभाग
  • स्मृती इराणी - महिला, बालविकास मंत्रिपद
  • धर्मेंद्र प्रधान -केंद्रीय शिक्षणमंत्री
  • पीयूष गोयल - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रिपद 
  • अश्विनी वैष्णव - केंद्रीय रेल्वेमंत्री
  • हरदीपसिंह पुरी - पेट्रोलियम मंत्रिपद
  • ज्योतिरादित्य शिंदे - नागरी उड्डाण मंत्रालय
  • नारायण राणे - मध्यम व लघु उद्योग मंत्रालय 
  • पुरुषोत्तम रुपाला -  दुग्धविकास, मत्स्योत्पादन खातं
  • अनुराग ठाकूर - केंद्रीय क्रीडामंत्री
  • पशुपती पारस  -अन्न प्रक्रिया मंत्रालय
  • गिरीराज सिंह - केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय
  • भुपेंद्र यादव  - केंद्रीय कामगार मंत्रालय
  • आर के सिंह - केंद्रीय ऊर्जामंत्री
  • किरण रिजिजू - केंद्रीय कायदेमंत्री

महत्त्वाच्या इतर बातम्या :