मुंबई :  केंद्रीय तपास यंत्रणेची करडी नजर महाराष्ट्रातल्या नेत्यांवर पाहायला मिळते. खास करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडी कडून समन्स बजावण्यात आले आहेत. तर अजूनही काही  नेते तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. कोणत्या नेत्यांवर काय आरोप आहेत. 


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. आतापर्यंत तीन वेळा त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. मात्र अद्याप ईडी कार्यालयात ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. या आधी ईडीकडून देण्यात आलेल्या दोन  समन्स वेळी वेगवेगळ्या कारणांमुळे ही चौकशी पुढे ढकलावी यासाठी माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांचा प्रयत्न राहिला. तर तिथेच 4 जुलै रोजी त्यांना देण्यात आलेल्या समन्सनंतर याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी माजी गृहमंत्री थेट दिल्लीला पोहोचले. तिथे दिल्लीतील कायदे तज्ञांकडून याबाबत सल्लामसल्लत केली.


मात्र केवळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागेच ईडीचा हा ससेमिरा नसून, महाविकास आघाडी सरकार मधील अजूनही इतर नेते आणि त्यांच्या  निकटवर्तीय यांच्यावर ईडी तसेच सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेची करडी नजर आहे.  काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात सीबीआय चौकशी करण्यात यावी, असा प्रस्ताव पास करण्यात आला होता. तर तिथेच भारतीय जनता पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय द्वारे चौकशी करावी अशी मागणीही केली होती. केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेल्या नेत्यांची यादी दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. 


 सध्या सर्वात चर्चेत असलेल्या  नेत्यांची नावे


शरद पवार


27 सप्टेंबर 2019 रोजी शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याची घोषणा केली. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार अजित पवार आणि इतर नेत्यांची नावं आल्याची माहिती मिळाली आणि शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचे ठरवले. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ नये म्हणून मुंबई पोलिस अधिकाऱ्यांच्या विनंती नंतर शरद पवार यांनी निर्णय रद्द केला.


सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता जप्त


ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती. दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली मालमत्ता ही अंधेरीतल्या कालेडोनिया इमारतीमधील होती. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांर्तग (पीएमएलए) कारवाई केलेल्या मालमत्तांमध्ये अंधेरी (पूर्व), मुंबई येथील कॅलेडोनिया बिल्डिंगमधील 10,550 चौरस फूट दोन व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. 35.48 कोटींची मालमत्ता राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी प्रीती श्रॉफ यांच्या मालकीची आहे. प्रीती श्रॉफ कॉंग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे.


राज ठाकरे


बुडीत निघालेली आयएल अॅण्ड एफएस कंपनी मागील काही महिन्यांपासून संकटात आहे. या कंपनीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे, यापैकी एक म्हणजे दादरमधील कोहिनूर सीटीएनएल. आयएल अॅण्ड एफएस कंपनीचे बरेच व्यवहार संशयास्पद आहेत यामुळे या व्यवहारात मनी लॉड्रिंग झालं आहे का या अनुषंगाने तपास सुरु असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी चौकशासाठी ईडीच्या रडारवर आहेत. आयएल अॅण्ड एफएस ही एक नामवंत फायनान्स कंपनी होती मात्र कंपनीबाबत बऱ्याच तक्रारी असल्याने कंपनीविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात ला आहे. आयएल अॅण्ड एफएसने मुंबईतील एका कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचं चौकशीत उघडकीस आलं. कोहिनूर स्क्वेअर टॉवर्सच्या उभं करण्यामागे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती. आयएल अॅण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे याची चौकशी सध्या ईडी करत आहे.



हितेंद्र ठाकूर


पीएमसी बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी वसई-विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर व भाई ठाकूर यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) वक्रदृष्टी कायम राहिली आहे. त्यांच्या विवा समूहाची 34 कोटी 36 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. त्यामध्ये मुंबई, ठाणे व विरारमधील फ्लॅट, कार्यालये, फार्महाऊस, आदींचा समावेश आहे. जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर आणि त्यांचे भाऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीच्या मालमत्ता आहेत. 


अनिल देशमुख


परमविर सिंह यांच्या 100 कोटींच्या आरोपांमुळे देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील हॉटेल मालकांकडून अवैधरित्या शंभर कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून केला होता. 20 मार्च रोजी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा आरोप केला होता. या आरोपानंतर उच्च न्यायालयात देखील याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली होती. या आधारावर ईडी कडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर 2 जुलैला छापेमारी करण्यात आली होती. मुंबई, नागपूर आणि गृहममंत्री असताना त्यांना देण्यात आलेले शासकीय निवस्थान ज्ञानेश्वरी या ठिकाणी हे धाड सत्र करण्यात आले. या धाडीनंतर देशमुख यांनी ईडी  कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे, यासाठी आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आल आहे. तर तिथेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखला ही ईडीने चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचा समन्स बजवलेला होते.यासोबतच शंभर कोटींच्या आरोपाबाबत अनिल देशमुख यांची सीबीआय कडून देखील चौकशी करण्यात आली होती.  


अजित पवार यांच्या नातेवाईकांवर ईडीकडून कारवाई


साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्यावर 1 जुलै रोजी कारवाई करण्यात आली होती.राजेंद्र कुमार घाडगे यांच्याकडे जरंडेश्वर साखर  कारखाना आहे. हा कारखाना आता ईडी कडून जप्त करण्यात आलाय. जरंडेश्वर साखर  कारखान्याच्या नावाखाली कर्ज घेऊन ते बुडवण्याचा ठपका या कारवाईत ठेवण्यात आला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान जरंडेश्वर साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाबाबत या कारखान्याला टाळे ठोकण्यात आले. या कारवाईमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा   धक्का मानला जातोय.सुरवातीला हा कारखाना  सहकारी स्वरुपाचा होता. मात्र नंतरच्या काळात आर्थिक कारणावरून कारखान्याची विक्री होऊन कारखान्याचे खासगीकरण झालं. राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं, तसंच साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आणि राजकीय व्यक्तींनी हे कारखाने खरेदी केले असा आरोप होत आहेत...


प्रताप सरनाईक यांच्यावर असलेले आरोप


प्रताप सरनाईक यांनी एनएसईएलमध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या घोटाळ्यांच्या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलाय. याबाबत ईडी कडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही  घरांवर छापेमारी करण्यात आली होती. याबाबत वेळोवेळी ईडी कडून ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांना देण्यात आले होते. 


संजय राऊत यांच्या पत्‍नींना आली होती ईडीची नोटीस


पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी संशयित असलेले प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांच्या पत्नीने 55 लाख रुपये  त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले होते. या 55 लाख रुपयाच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ईडी कडून 28 डिसेंबर 2020 रोजी नोटीस बजावण्यात आली होती. यासंबंधी दोन वेळा वर्षा राऊत ह्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित झाल्या होत्या. ईडीची चौकशी होण्याआधीच हे 55 लाख रुपये वर्षा राऊत  यांनी  परत केले होते. 


 अविनाश भोसले यांची ईडीकडून मालमत्ता जप्त


काँग्रेसचे मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आणि बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करत ईडी ने कारवाई केली. ही कारवाई 21 जून रोजी करण्यात आली होती. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली होती.या आधीही भोसले यांची चौकशी करण्यात होती.अविनाश भोसले यांची सर्व पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत वैयक्तिक हितसंबंध आहेत. त्यामुळे अविनाश भोसले यांच्यावर झालेले कारवाईचे धागेदोरे महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्या पर्यंत पोहोचू शकतील याबाबत आता तर्कवितर्क लावले जाऊ लागले.
तर ईडीकडून अविनाश भोसले यांचा मुलगा स्वप्निल जोशीची सुद्धा चौकशी करण्यात आली.


अनिल परब  यांच्यावर भाजपाच्या आरोपाची टांगती तलवार


अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे 10 कोटींचा बेकायदेशीर रिसॉर्ट बांधले  असल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत  किरीट सोमय्या यांकडून सीबीआय आणि आयकर विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.  तसेच वेळोवेळी सचिन वाझे प्रकरणात देखील अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलाय.


रविंद्र वायकर यांनी  अवैध्यरित्या अलिबागमध्ये बंगले खरेदी केल्याचा आरोप


अलिबाग मधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून 30 जमीनीचे करार  करण्यात आले. जमीनीचे करार, ग्रामपंचायतमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील १९ बंगले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.  ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. 19 बंगल्यांची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी रविंद्र वायकर यांच्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रॉपर्टी बाबत रवींद्र वायकर आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत


कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी  माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर कारवाई


पनवेलच्या कर्नाळा बँकेत 529 कोटींच्या घोटाळा केल्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर ईडी कडून कारवाई करण्यात आली होती. 16 जून रोजी ही कारवाई झाली असून,  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेलच्या राहत्या घरातून अटक केली होते.


सुनील तटकरे


ईडीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कोकण पाटबंधारे तसेच कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाकडे सिंचन प्रकल्पांशी संबंधित कागदपत्रे मागवली होती 1999 ते 2009 या कालावधीत निविदा,प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता,कंत्राटदारांना दिलेली रक्कम अशी कागदपत्रे ईडी ने मागवली होती. या प्रकरणात ईडी सक्रिय झाल्यामुळे सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. सिंचनावर हजारो कोटींचा खर्च होऊनही दहा वर्षात केवळ 0.1 टक्के जमीन सिंचनाखाली आल्यात राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात (कॅग) नमूद करण्यात आले होते...



एकनाथ खडसे


भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यामध्ये चौकशी करण्यात आली होती. त्याच्या अगोदर देखील या प्रकरणी ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. भाजपाला सोडचिठ्ठी देऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आपल्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे एकनाथ खडसे यांनी अनेकदा म्हटले होते.


रत्नाकर गुट्टे


रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना ईडीने जोरदार दणका दिला होता. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ईडीने ही कारवाई केली होती. गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी, बीड आणि धुळ्यातील जवळपास 255 कोटींची मालमत्ता जप्त केली गेली होती. ईडीने मोठी कारवाई करत गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडसह तीन कंपन्यांची सुमारे 255 कोटींची मालमत्ता जप्त केली. ईडीने जीएसईएलशिवाय योगेश्वरी हॅचरिज आणि गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेड विरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली. या तिन्ही कंपन्यांविरोधात मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.


अनिल भोसले


पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सुमारे 71 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अंमलबजावणी संचालनालयाने 7 मार्च 2021 ला अटक केली आहे. भोसले यांना याच गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पूर्वीच अटक केली आहे. येरवडा कारागृहातून त्यांच्यासह चौघांना 'ईडी'ने अटक केली. भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेवर निवडून आले. मात्र, नंतर त्यांच्या पत्नी रेश्मा या अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सहयोगी सदस्य बनल्या.


तर काही बड्या विकासकांना आणि व्यासायाईक सुद्धा  कारवाईचा तडाखा बसला



राणा कपूर


येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना ईडीने अटक केली होती. राणा कपूरला यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि हे प्रकरण एचडीआयएल आणि मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित होते. 


वाधवान


येस बँक घोटाळ्यात ईडीने कपिल वाधवान व धीरज वाधवान या बंधूंना अटक केली आहे. हे दोघेही दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक आहेत. दोन दिवसांपूर्वीच या दोघांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटकेपासून संरक्षण देण्याला विशेष न्यायालयाने नकार दिला होता. 


येस बँकेचे राणा कपूर यांनी डीएचएफएलला दिलेले जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडित खात्यात गेले. हे कर्ज बेकायदा देण्यात आले होते. मुख्य म्हणजे, वाधवान बंधूंनी या कर्जाचा दुरुपयोग करून अंडरवर्ल्डच्या इक्बाल मिर्चीकडून जमीन खरेदी केल्या, असेही ईडीच्या तपासात समोर आले आहे. एकूणच या सर्व संबंधांचा तपास करण्यासाठी ईडीकडून वाधवान बंधूंना अटक करण्यात आली होती.


ओमकार बिल्डर


झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ओमकार समूहाचे अध्यक्ष कमल नाथ गुप्ता आणि आणि व्यवस्थापकीय संचालक बाबू लाल वर्मा यांना सक्तवसुली संचनालयाने (ED) अटक केली होती. चौकशीत सहकार्य न केल्याप्रकरणी ईडीने गुप्ता आणि वर्मा यांना ताब्यात घेतले आहे.'ओमकार रियल्टर्स' या कंपनीत जवळपास 22 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर 'ईडी'ने ओमकार रियल्टर्सच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर ओमकार समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांची झडती घेतली होती. एकाचवेळी ओमकार समूहाशी संबंधित दहा ठिकाणी छापे पडल्यामुळे बांधकाम व्यवसायात खळबळ उडाली होती. या छाप्यात 'ईडी'च्या हाती अनेक गोपनीय कागद लागले आहेत. त्यानुसार झालेल्या चौकशीनंतर आज कमल नाथ गुप्ता यांना अटक करण्यात आली होती.