सांगली : मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवत दोन दिवस उपचार सुरु ठेवत बनावट कागदपत्रे बनवून जादा बिल आकारल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीमधील इस्लामपुरातील आधार हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं असून आता या प्रकरणी आधार हॉस्पिटलचा डॉ. योगेश वाठारकर याच्यावर विश्वासघात, फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद करत इस्लामपूर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. 24 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात ही घटना घडली आहे.


इस्लामपूर पोलिसांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमार्फत मागवलेल्या अहवालात वाठारकर दोषी आढळून आल्याने मृत महिलेचा मुलगा सलीम शेख याच्या फिर्यादीनंतर ही कारवाई करण्यात आलीय. आतापर्यंत कोरोना रुग्णावर उपचार घेणाऱ्या रुग्णाबाबत हॉस्पिटलकडून जादा पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र डॉ. वाठारकरने पैशांचा हव्यासापोटी नॉन कोविड रुग्णाच्या कुटुंबालाही लुबाडण्याचा प्रयत्न केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालीय. सलीम यांना दहा मार्चपर्यंत तुमच्या आईवर उपचार केल्याचे सांगून 41 हजार 289 इतके ज्यादा बिल बनावट कागदपत्रे तयार करून दिले आणि ते भरून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. 


 डॉ.वाठारकर याच्याकडे सायरा हमीद शेख(60) यांना त्याच्या मुलाने उपचारासाठी दाखल केले होते. 24 फेब्रुवारी ते 10 मार्च या काळात वेगवेगळ्या तपासणी करुन जनरल व आयसीयू मध्ये उपचार केले.10 रोजी त्यांचा मृत्यू दाखवून मृतदेह ताब्यात दिला. एक महिन्यांनी मुलगा सलीम हा नगरपालिकेत मृत्यूचा दाखल घेण्यास गेला. मात्र आईचा मृत्यू 8 रोजी झाल्याचे हॉस्पिटलमधू कळवलेल्या नोंदीवरून त्याच्या लक्षात आले. त्याने याप्रकरणी पोलिसांना अर्ज देवून दाद मागितली. पोलिसांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल मार्फत अहवाल मागवला. त्यामध्ये वाठारकर दोषी आढळून आल्याने सलीम याने फिर्याद दिली.


रुग्ण सायरा यांच्यावर नॉन कोविड उपचारादरम्यान 8 मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्या पासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरू ठेवले.दोन दिवसांनी डॉ.वाठारकर यांनी नातेवाईकांना बोलावून रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली. वास्तविक आईच्या उपचराबाबत दोन दिवस माहिती न दिल्याने शंका आली होती. सलीम यांना दहा मार्चपर्यंत तुमच्या आईवर उपचार केल्याचे सांगून 41 हजार 289 इतके ज्यादा बिल बनावट कागदपत्रे तयार करून दिले आणि ते भरून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक करण्यात आली. 


नगरपरिषदेच्या रेकॉर्डवरच्या नोंदीमुळे डॉक्टरचे बिंग फुटले!


सायरा शेख यांचा आधार हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 8 मार्चला मृत्यू झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे. मृत्यु प्रमाणपत्राच्या नोंदीवरून मृत्यू आठ मार्चला झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र डॉक्टरांनी मृतदेह 10 मार्चला ताब्यात दिला. यामुळे नेमके काय? ही परिस्थिती नातेवाईकांनी जाणून घेत डॉक्टर विरोधात तक्रार केली. आणि या प्रकरणी पाठपुरावा केला. सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी करत मृतदेहाची विटंबना केल्याचे अखेर बिंग फुटले. अन् डॉ. वाठारकर अलगद फसवणूकीच्या गुन्ह्यात अडकला.