मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शरद पवारांच्या गाडीत, सिल्वर ओकवर खलबतं
मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) प्रमुख शरद पवार यांच्या भेटीला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर पोहोचले आहेत.

मुंबई : मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) प्रमुख शरद पवार यांच्या भेटीला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर पोहोचले आहेत. आमदार सचिन अहिर हे शरद पवार यांच्या गाडीत बसून सिल्वर ओकच्या दिशेने गेले आहेत. आमदार अहिर यांच्या आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पवार यांच्यासोबतच्या भेटीने राजकीय भुवया उंचवल्या आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फारकत घेत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर "मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" नेमका कुणाचा? या मुद्द्यावरून दोन्ही नेते न्यायालयातही गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक गाठीभेटी होऊ लागल्या. काही सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र व्यासपीठावर दिसल्याचेही अनेक वेळा पाहायला मिळाले. यानंतर शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पुन्हा एकत्र येण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाली. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. मात्र अंतिम निर्णय सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचाच असेल,” असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.
वार कुटुंब एकत्रित येणार असेल तर आनंद : वक्ते प्रवीण कुंटे पाटील (शरद पवार गटाचे प्रवक्ते)
राजकारण हा नेहमीच शक्यतेचा खेळ आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि पवार कुटुंब एकत्रित येणार असेल, तर सामान्य कार्यकर्त्यांना त्याचा आनंदच होईल, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी दिली आहे. सध्या तरी पक्षात कुठल्याही व्यासपीठावर दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू नाही, असा दावाही प्रवीण कुंटे पाटील यांनी केला.
शरद पवार यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी : संजय राऊत
शरद पवार यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. आमच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका जरूर आहे. पण आमच्या संस्था टिकाव्या, आमचे कारखाने टिकावे, कारखान्यावर आमची माणसं टिकावी म्हणून आमचं राजकारण नाही. आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आहे. जे येतील ते आमच्यासोबत नाहीतर त्यांच्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र आहे. आला तर सोबत नाहीतर तुमच्याविना संघर्ष सुरु राहणार, असे त्यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
Anil Deshmukh on NCP Crisis : दादा-ताई एकत्र येतील का, तुमच्या मनात काय? अनिल देशमुख म्हणाले, जवळ या तुमच्या कानात सांगतो...
























