Yashwant Jadhav Shivsena : मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षात जाधव आणि अगरवाल यांनी मुंबईत 36 मालमत्ता खरेदी केली आहे. याचाच अर्थ  जाधव आणि अग्रवाल यांनी सरासरी वीस दिवसांत एक मालमत्ता खरेदी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासातून ही माहिती समोर आलीय. यशवंत जाधव यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची यादी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे.  दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर यशवंत जाधव आणि अगरवाल यांची प्रतिक्रिया प्रतिक्षेत आहे. 


यशवंत जाधव यांची 36 मालमत्तांची खरेदी?


केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 36 मालमत्तांची खरेदी केलेली आहे. गेल्या दोन वर्षांत हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


कोणत्या वर्षात किती मालमत्ता खरेदी ?  
2020 - 07 
2021 - 24


कोणत्या महिन्यात किती मालमत्ता खरेदी ? 
मार्च 2020     - 1 
डिसेंबर 2020    - 2 
जानेवारी 2021 - 3  
फेब्रुवारी 2021 - 2 
मार्च 2021 - 5  
मे 2021 - 1 
जून 2021 - 2 
जुलै 2021 - 6 
ऑगस्ट 2021 - 2 
डिसेंबर 2021 - 3 


चार दिवस सुरू होती छापेमारी 


जवळपास चार दिवस आयकर विभागाने जाधव यांच्या घरी ठिय्या मांडला होता. यावेळी त्यांनी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट अफेयर्सने यशवंत जाधव यांच्या 12 हून अधिक शेल कंपन्या उघडकीस आणल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचेही चौकशीत समोर आले होते. त्याशिवाय कंपनी कायद्यानुसार या कंपन्यांमध्ये काही त्रुटीदेखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे.