FIR filed against Vaibhav Gehlot : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष वैभव गेहलोत यांच्याविरुद्ध नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकचे व्यावसायिक सुशील भालचंद्र पाटील यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये वैभव गेहलोत यांच्याविरोधात फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथील पर्यटन विभागाच्या ई-टॉयलेटसह इतर विभागात निविदा काढण्याच्या नावाखाली सहा कोटी ऐंशी लाखांची फसवणूक केल्याचा आरोप पाटील यांनी गेहलोत यांच्यावर केला आहे.
दरम्यान, 17 मार्चला नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात वैभव गेहलोत यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, मुख्य आरोपी गुजरात काँग्रेसचे सचिव सचिन पुरुषोत्तम वालेरा आहे. वलेरा यांचे वडील पुरुषोत्तम भाई वालेरा हे देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. पाटील यांनी त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सचिन वलेराने स्वत:ला जाहिरात व्यावसायिक असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी 13 राज्यांतील पेट्रोल पंपांवर जाहिरातींचे कंत्राट असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाशी आपले चांगले संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्यासोबत कामात पैसे गुंतवले तर भरपूर कमाई होईल, असे आश्वासन सचिनने दिल्याचे पाटील यांनी सांगितले. तुम्हाला फक्त नावापुरतेच निविदेत सहभागी व्हायचे आहे, असे पाटील यांना सांगितले. वैभव गेहलोत हे उर्वरित काम पाहतील, असंही त्यांनी सांगितले होते.
या संपूर्ण गुंतवणुकीची माहितीही सचिनने सुशील पाटील यांना दिली होती. राजस्थान सरकारची कथित निविदा परिपत्रके सचिनने दाखवली असली तरी ती सर्व बनावट असल्याचे नंतर दिसून आले. सचिनच्या सांगण्यानुसार सुमारे सहा कोटी ऐंशी लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर केल्याचे पाटील यांनी सांगितले. नंतर अनेकवेळा त्याने सचिनकडे पैसेही मागितले, मात्र तो टाळत राहिला आणि नंतर त्याचा फोनही येणे बंद झाले. यानंतर पाटील यांनी कोर्टामार्फत सचिनभाई पुरुषोत्तम भाई वालेरा, वैभव गेहलोत, किशन कँटेलिया, सरदारसिंग चौहान, प्रवीणसिंग चौहान, सुहास सुरेंद्रभाई मकवाल, निवभाई महेशभाई वीरमाभट, विश्वरंजन मोहंती, राजबीर सिंग शेखावत, प्रग्नेशकुमार विनोदचंद्र, प्रकाश कुमार, राजेंद्रभाई मकवाल. देसाई, सावनकुमार ए. पारनेर, ऋषिता शहा व विराज गंवाल यांच्यावर आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला. बनावट निविदा कागदपत्रे दाखवून पैसे हडप करण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर वैभव गेहलोत यांनी उत्तर दिले असून, सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे.
काय म्हणाले वैभव गेहलोत
सध्या एका प्रकरणात मीडियात माझ्या नावाची चर्चा सुरु आहे. त्या प्रकरणात माझेही नाव टाकण्यात आले आहे. मला त्याबद्दल कोणतीही माहिती नाही. माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. आपणा सर्वांना माहितच आहे की, निवडणुका जवळ आल्या की खोटे आरोप केले जातात. तसेच कट कारस्थान रचली जातात असेही वैभव गेहलोत यांनी सांगितले.
आता या प्रकरणावरुन राजकारण चांगलचं तापताना दिसत आहे. सध्या राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. सोमवारी अधिवेशन सुरु झाल्यानंतर या प्रकरणावरुन सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतीश पुनिया यांनी या प्रकरणाबाबत ट्विट करत वैभववर दाखल झालेल्या गुन्ह्याची सत्यता सर्वांसमोर ठेवण्याची मागणी केली आहे.