Sanjay Raut : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील काही काळात मुस्लिमांबाबत केलेले वक्तव्य लक्षात घेता भाजपही त्यांना आणि संघाला जनाब सेना संबोधणार का असा उलट प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी भाजपला केला आहे. 


शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची आजपासून सुरुवात झाली. या अभियानातंर्गत शिवसेनेचे खासदार आजपासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यानिमित्ताने नागपूरमध्ये संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 


सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए सारखा असल्याचेही वक्तव्य केले होते. त्यानंतरही त्यांनी मुस्लिमांबाबत काही वक्तव्ये केली होती. मोहन भागवत यांना आता त्या वक्तव्यावरून ते जनाब सेना झाले का, संघाने मुस्लिमांसाठी राष्ट्रीय मंचाची स्थापना केली. त्यामुळे ते जनाब सेनेचे प्रमुख झाले का, असा उलट सवाल त्यांनी भाजपला केला. 


मागील काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. एमआयएमने शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबत चर्चेची तयारी दाखवल्यानंतर भाजपने शिवसेनेवरील टीकेची धार आणखी तीव्र केली होती.


केंद्रीय तपास यंत्रणांचा खुळखुळा केलाय


भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा खुळखुळा केला असून विरोधकांना हा खुळखुळा वाजवून भीती दाखवली जात असल्याचे टीकास्त्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोडले. भाजपने तपास यंत्रणांचा वापर पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखा सुरू केला आहे. विरोधकांना ईडीचे भय दाखवण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha