Amaravati: अमरावती जिल्ह्यात ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत 15 तरुणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहून परतणाऱ्या एका गटाने रस्त्यावर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावरूनच दुसरा गट आणि चित्रपट पाहून आलेल्या या गटात जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. 


काय आहे प्रकरण?


हे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील लाल पूल परिसरातील आहे. अचलपूर येथील एका सिनेमागृहातून चित्रपट पाहून परतणाऱ्या तरुणांच्या एका गटाने लाल पुलाजवळ येऊन जय श्री रामचे नारे लगावले. यावेळी त्याच परिसरातील आझाद नगरमध्ये राहणाऱ्या तरुणांच्या आणखी एका गटाने याचा विरोध केला. यावरून या दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाला आणि नंतर या दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. या मारामारीत अनेक तरुण जखमी झाले आहेत.


द कश्मीर फाइल्सवर बंदी घाला, विरोधी पक्षाची मागणी


द कश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबत विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. तर जवळपास 9 राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. यातच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत काश्मिरी पंडितांच्या पलायन विरोधात आवाज उठवला आहे. 1990 मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनवरून त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले आहेत की, जेव्हा काश्मिरी पंडितांना घरे सोडण्यास भाग पाडले जात होते, तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते राजीव गांधी यांनी तत्कालीन व्ही पी सिंग सरकारला काश्मीरमध्ये पंडित आणि शिखांवर सुरु असलेले अत्याचार थांबवा, अशी विनंती केली होती.


काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, 1990 मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांचे सरकार भाजपच्या पाठिंब्यावर चालत होते आणि त्यावेळी जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी स्थलांतरित पंडित आणि शीखांना सांगितले होते की, 'आम्ही तुम्हाला वाचवू शकत नाही. तुम्ही येथून बाहेर निघा.'