Sanjay Kadam : कोकणातील महाविकास आघाडीमध्ये देखील सूर्याजी पिसाळ असल्याचा आरोप शिवसेना नेते आणि माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. या वक्तव्यावरुन संजय कदम यांचा रोख शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्याकडे असल्याचे दिसत आहे. ऑडिओ क्लिप आणि सोमय्या प्रकरणात संजय कदम यांनी गंभीर आरोप केला आहे. कदम यांच्या या वक्तव्यामुळं शिवसेनेच्या अंतर्गत वादाची झलक पाहायला मिळाली आहे.


दापोलीत समुद्र किनाऱ्यावर अनेक जणांची रिसॉर्ट आहेत. याप्रकरणी 267 जणांना कायद्याचे उल्ल्घंन केले म्हणून नोटीस दिल्या असल्याचे संजय कदम म्हणाले.  दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्याला आमचा विरोध आहे. काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा निषेध करणार असल्याचे कदम म्हणाले.
 
किरीट सोमय्या हे प्लास्टिकचा मोठा हातोडा घेऊन दापोलीकडे येत आहेत. जे रिसॉर्ट बेकायदेसीर आहेत ते तोडण्यासाठी सोमय्या येत आहेत. सरकारच्या संरक्षणामध्ये कोकणात यायचं आणि त्या हातोड्यानं बेकायदेशी रिसॉर्ट तोडणार म्हणायचं असेही कदम म्हणाले. वादळांमुळं आधीच कोकणाचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचं संकट असल्यामुळं येथील व्यवसायिक आधीच संकटात सापडल्याचे कदम यावेळी म्हणाले. अनेक व्यवसायिकांची विजेची कनेक्शन कट केली आहेत. अनेक हॉटेल व्यवसायिकांना नोटीस आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.


दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज दापोली दौऱ्यावर आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. मंत्री परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झालेत. मात्र, त्यांचा या दौऱ्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


सोमय्या यांच्या दौऱ्यादरम्यान तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यातून वादविवाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोटीस बजावली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: