Madhu Mangesh Karnik : ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी सध्या सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. त्यांनी सध्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनापेक्षा राजकारण भयंकर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. राजकारण भयंकर आहे, कोरोनावर मात केली आपण, पण राजकारणावर मात करणे शक्य नसल्याचे  मधू मंगेश कर्णिक म्हणालेत.


सध्याच्या राजकारणाची पातळी खालावली आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मधू मंगेश कर्णिक यांच्या प्राप्तकाल या कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्णिक यांनी चिंता व्यक्त केली. सध्या जी माणसं त्या पद्धतीनं राजकारण करत आहेत, असं मी माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात कधी पाहिलं नाही. असं पाहिल्यावर दु:ख होतं. असचं चाललं तर पुढचं आयुष्य कसं जाईल असेही कर्णिक यावेळी म्हणाले. सध्या राजकारणी एकमेकांची उणीदूणी काढत आहेत. तुम्ही राज्यकारभार केव्हा करणार? हा माझा प्रश्न असल्याचे मधू मंगेश कर्णिक म्हणाले.


मधू मंगेश कर्णिक


मधु मंगेश कर्णिक हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आहेत. ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. सध्या ते राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. याशिवाय कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करुळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले. तेथे ते मुलांच्यात रमतात. 90 व्या वर्षीही त्यांचा हात लिहिता राहिलेला आहे. त्यांचे कसदार लेखन वाचणे, हा एक आनंदानुभव आहे. गेली साठ-पासष्ट वर्षे कर्णिक सातत्याने लेखन करताहेत. लेखन हे त्यांच्या आयुष्याचे व्रत आहे आणि ते त्यांनी आनंदाने स्वीकारले आहे. आपल्या अवतीभोवतीचा परिसर आणि माणसे, साऱ्या स्पंदनांसह गोचर करणारी अनुभवसिद्ध शब्दकळा, तशीच प्रसन्न शैली कर्णिकांना लाभलेली आहे. कथा, कादंबरी आणि ललित निबंध हे मूलबंध हाताळताना, आपल्या भूमीशी असलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही.