मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापतींची नियुक्ती आज होणार आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. आज विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाले, त्यावेळी सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा केली.
विधानपरिषद कामकाज सुरू झाले त्यावेळी सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा केली. आवाजी मतदानाने उपसभापती पदाची निवडणूक घेण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेत मंजूर झाला असून आज मध्यांतरानंतर निवडणूक होणार आहे.
दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. गोऱ्हे यांचा अर्ज दाखल करतेवेळी मंत्री विनोद तावडे, दिवाकर रावते, महादेव जानकर उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांची निवड बिनविरोध होईल अशी शक्यता आहे. जरी निवडणूक झाली तरी विधानपरिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता नीलम गोऱ्हे यांचीच नियुक्ती होईल, असे चित्र आहे.
उपसभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडल्यास विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा करु, अशी अट मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसमोर ठेवल्याचीही माहिती होती. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यास विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला उपसभापती पद देऊन राज्यसभेतील उपाध्यक्ष पदाची नाराजी दूर करण्यात भाजपला मदत होईल, तर काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मिळेल. या गोष्टी पाहता मुख्यमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे.
विधानपरिषदेत सध्याचं पक्षीय बलाबल
भाजप : 23
शिवसेना : 12
राष्ट्रवादी काँग्रेस : 17
काँग्रेस : 16
लोकभारती : 1
शेकाप : 1
रासप : 1
पीआरपी(कवाडे गट) : 1
अपक्ष : 6
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हेंचं नाव जवळपास निश्चित, आज घोषणा होण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2019 12:48 PM (IST)
नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. विधानपरिषद कामकाज सुरू झाले सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -