मनमानड : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं बऱ्याचदा म्हटलं जातं. लग्नाचं स्वप्न रंगवणाऱ्या अशाच एका तरुणाला तरुणीने लग्न करुन फसवल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचत या तरुणीला अटक केली. विशेष या तरुणीने यापूर्वी तीन जणांशी विवाह करुन त्यांची फसवणूक केली होती. मनमाडसोबतच्या तरुणासोबत तिचा चौथा विवाह होता. मात्र पाचव्या लग्नाच्या तयारत असताना ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

मनमाडमधील संभाजीनगर इथे राहणाऱ्या जयेश डोंगरे या तरुणाचं कुटुंब त्याच्यासाठी तरुणीचा शोध घेत होतं. या दरम्यान, डोंगरे कुटुंबीयांची ओळख लातूरच्या पुजा भगवान मुळे या महिलेशी झाली. तिने डोंगरे कुटुंबाला लातूरमधील अहमदपूर इथल्या बंडू बेंद्रे यांची मुलगी ज्योतीचं स्थळ सुचवलं. ज्योती सुंदर आणि सुशिक्षित असून तुमच्या मुलाशी तिचा विवाह लावू, असं तिने सांगितलं. मात्र बेंद्रे कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्याकडे लग्न लावण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे लग्नाचा सगळा खर्च तुम्हाला करावा लागेल. तसंच त्यांची मदत करण्यासाठी तुम्हाला त्यांना पैसे द्यावे लागतील, असं पुजा मुळेने सांगितलं.

यानंतर डोंगरे कुटुंब मुलगा जयेशला सोबत घेऊन मुलगी पाहायला अहमदपूर इथे गेले. मुलाला मुलगी पसंत पडली आणि 12 मे रोजी दोघांचे लग्न झालं. लग्नाआधी डोंगरे कुटुंबाने मुलीच्या घरच्यांना 40 हजार रुपये रोख दिले होते. शिवाय लग्नात मुलीच्या अंगावर 50 हजार रुपयांचे दागिने घातले होते. ज्योती काही दिवस सासरी राहिली आणि नंतर माहेरी गेली, ती पुन्हा परतलीच नाही.

डोंगरे कुटुंबाने वारंवार प्रयत्न करुनही सून परत येत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी खोलात जाऊन तपास केला असता, ज्योतीचं यापूर्वी तीन लग्न झाल्याचं समजताच डोंगरे कुटुंबाला धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अखेर डोंगरे कुटुंबीयांनी मनमाड पोलिसात धाव घेत सून ज्योती, तिचे आई-वडील, मध्यस्थ असलेली पुजा मुळे आणि तिच्या पतीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसात तक्रार दाखल झाल्याची कुणकुण लागताच आपलं बिंग फुटू नये म्हणून सर्व जण तडजोड करण्यासाठी मनमाड इथे डोंगरे कुटुंबाच्या घरी आले. मात्र पोलिसांनी सापळा रचत सगळ्यांनाच ताब्यात घेत त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली. विशेष म्हणजे पूर्वी तीन जणांशी विवाह करुन त्यांची फसवणूक करत, चौथ्या नवऱ्याला फसवणारी ज्योती बेंद्रे पाचव्या लग्नाच्या तयारीत होती. तेव्हाच ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.