युतीसाठी शिवसेना-भाजपचा 50-50 फॉर्म्युला ठरला आहे. मित्रपक्षाचं काय करायचं ते ऐनवेळी ठरवू असंही दानवेंनी सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात जागा वाटपावरुन शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची भाजपची भूमिका असल्याचंही दानवेंनी सांगितलं. मुख्यमंत्री पदाबाबत आमचं ठरलं असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री पदावरुन सध्या भाजप आणि शिवसेनेचे नेते सूचक इशारे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपात सगळं समसमान पाहिजे, असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी नुकतंच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केले होते. तर वाघ सिंहाची जोडी एकत्र येते त्यावेळी कुणी राज्य करावं हे सांगावं लागत नाही. आम्हाला सत्ता पदांकरिता नको आहे तर लोकांच्या सेवेसाठी हवीय. आमच्यासाठी मुख्यमंत्री पद गौण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं.
नुकतेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाच मोठा भाऊ असून भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला होता. तर भाजपा आणि शिवसेना विधानसभेतही एकत्र लढणार असून लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठा विजय मिळवणार असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते.