मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत होणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवसेनेला आमंत्रण नसल्याची माहिती मिळत आहे. येत्या 18 डिसेंबर रोजी कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (गुरुवारी) महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर चर्चा झाली. येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका सुरु होणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मेट्रोच्या कामांचं भूमिपूजन कार्यक्रम मोदींच्या उपस्थित होणार आहे.

नागपूरमध्ये समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी साधारण एक लाख लोकांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती मिळत आहे. तशी तयारीही राज्यसरकारकडून करण्यात येत आहे.

कल्याणमध्ये दोन नवीन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
8 हजार 500 कोटी खर्च करुन हा मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ठाणे - भिवंडी - कल्याण असा 24.09 किमीचा हा मार्ग असणार आहे. या अंतरात सुमारे 17 स्थानके असतील. तसेच दहिसर ते मीरा भाईंदर 12 किमीचा मेट्रो मार्ग असणार असून यामार्गावर 17 स्थानके असणार आहेत. या प्रकल्पासाठी तब्बल 6 हजार 600 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

या दोन्ही मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन 18 डिसेंबर रोजी होणार आहे. पण या भूमिपूजन सोहळ्यात युतीतले सहकारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही सहभागी करून घेणार का? असा चर्चा सध्या सुरु आहे.