बीड : मेगा भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा फायदा उमेदवारांना होणार असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र नुकत्याच जाहिर झालेल्या 342 जागांसाठीच्या भरतीत एसईबीसीसाठी पर्यायच नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 342 जागांसाठीच्या भरतीच्या जाहिरातीतील विविध पदांसाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जी माहिती अपलोड करायची आहे, ती माहिती भरली जात नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत.
मोठ्या प्रतिक्षेनंतर एमपीएससीने 342 जागांसाठी जाहिरात काढली. ही जाहिरात प्रकाशित होऊन पाच दिवस झाले आहेत. मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या कोट्यातून फॉर्म भरण्याची व्यवस्थाच नाही. एमपीएससीच्या साईटवर अद्याप सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीची माहिती भरता येत नाही.
16 टक्के आरक्षण असतानाही आठ टक्केच फायदा
नोकरी भरतीच्या जाहिरातीनंतर अनेक विद्यार्थी आता फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र त्यांच्या प्रत्येकाच्या प्रोफाईलमध्ये जात प्रवर्गामध्ये बदलच करता येत नसल्याने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर या नोकरभरतीत पुन्हा निराशाच हाती येते की काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. तर दुसरीकडे जातीचा प्रवर्ग कसा बदलायचा याचीदेखील माहिती कुठेच उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असतानाही या जाहिरातीवर नजर टाकल्यावर आठ टक्के इतकाच फायदा मराठा समाजातील मुलांना होणार आहे असे दिसते.
विद्यार्थ्यांच्या तक्रारी मात्र आयोगाकडून उत्तर नाही
या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी इतर समाजातील मुलांसाठी त्यांच्या वेगळ्या प्रवर्गाची सोय या साईटवर करण्यात आली आहे. मात्र मराठा समाजातील मुलांना अद्यापही या साईटवर आपला प्रवर्ग बदलता येत नाही. याची माहिती घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांना ई-मेलही केले आहेत. मात्र आयोगाकडून कुठलंही उत्तर मिळत नसल्याचं समोर आलं आहे.
मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी मुलांना मराठा जातीचे प्रमाणपत्र शासनाकडून मिळू लागले आहे. विशेष म्हणजे एमपीएससीचा फॉर्म भरताना 2014 साठी ज्या मुलांना मराठा समाजाचा जातीचे प्रमाणपत्र मिळाले होते, तेसुद्धा चालणार आहे. मात्र भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन आता पाच दिवसाचा कालावधी उलटला तरी फॉर्म कसा भरायचा? याची माहितीच उपलब्ध नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थी चिंतेत आहेत.
एमपीएससी भरतीत मराठा समाजासाठी राखीव जागा
पद एकूण जागा एसईबीसी
उपजिल्हाधिकारी 40 04
पोलीस उप अधीक्षक 34 03
सहायक पोलीस आयुक्त
सहायक संचालक 16 01
(वित्त व लेखा सेवा)
तहसीलदार 77 06
उप शिक्षणाधिकारी 25 02
(राज्य शिक्षण सेवा)
कक्ष अधिकारी 16 01
सहायक गट विकास अधिकारी 11 01
नायब तहसीलदार 113 08
भरतीत 'एसईबीसी'साठी पर्यायच नाही, मराठा विद्यार्थ्यांना फायदा कधी?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Dec 2018 03:42 PM (IST)
मोठ्या प्रतिक्षेनंतर एमपीएससीने 342 जागांसाठी जाहिरात काढली. ही जाहिरात प्रकाशित होऊन पाच दिवस झाले आहेत. मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या कोट्यातून फॉर्म भरण्याची व्यवस्थाच नाही. एमपीएससीच्या साईटवर अद्याप सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीची माहिती भरता येत नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -