मुंबई : शेतकरी कर्जमाफीची मर्यादा 1 लाखावरून 2 लाख करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना केल्याचं सूत्रांकडून समजतंय. मातोश्रीवर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ही सूचना केल्याचं समजतंय.
आजच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन 91 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबतचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. तसंच मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीत कॅबिनेट नोट काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
सध्या महसूलमंत्री चंद्राकांत पाटील शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यातील इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. काल रात्री त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन, काँग्रेसची जाणून घेतली. त्याच प्रमाणे आज महसूलमंत्र्यांनी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली.
दरम्यान, या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, ''शेतकरी कर्जमाफी संदर्भात सर्व पक्षांशी चर्चा करुन एक चांगला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याचा प्रयत्न आहे. या प्रस्तावामुळे राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल. त्यासाठी प्रस्ताव तयार करताना पैशांची मर्यादा वाढली तरी चालेल, पण शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि समन्वय साधण्यासाठी हा प्रस्ताव असून, मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडणार आहोत,'' असं त्यांनी यावेळी सांगितलं.
दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी निकष ठरवण्यासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत एक तास बैठक झाली. या बैठकीसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते.
जवळपास तासभर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे निकष काय असावेत? याबद्दल सरकारने प्रस्ताव मांडला. त्यावर शरद पवार यांनी सूचना केल्याचं चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितलं होतं.
संबंधित बातम्या
6 जनपथवर पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय झालं?