पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना नगरसेवक आणि महापालिका गटनेते राहुल कलाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप पालिका अधिकारी अनिल राऊत यांनी केला आहे. मात्र यामागे राजकीय डावपेच असल्याचा दावा राहुल कलाटेंनी केला आहे.


अभियंता सतीश इंगळे यांच्या कार्यालयात 11 फेब्रुवारीला हा प्रकार झाल्याचा आरोप आहे, तर कलाटेंवर 13 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवस उशिरा गुन्हा दाखल केल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याचं कलाटेंचं म्हणणं आहे.

टीडीआर प्रकरणावरुन राहुल कलाटे आणि अनिल राऊत यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती आहे. कलाटेंनी आधी फोनवरुन शिवीगाळ केली. त्यानंतर कलाटे आणि विनोद मोरे इंगळे यांच्या कार्यालयात आले. त्यावेळी राऊत तिथेच बसलेले असताना त्यांच्या अंगावर खुर्ची फेकून मारली आणि त्यांची गचंडी धरत दमबाजी केली, असा आरोप कलाटेंवर आहे.

सोमवारी घडलेला हा प्रकार पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी पोहचला. पण मी केवळ फोनवर बोललो असून यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा कलाटेंनी केला आहे. मी विधानसभेचा उमेदवार असल्याने माझ्याविरोधात डावपेच खेळले जात आहेत, असं कलाटेंचं म्हणणं आहे.