बारामती : गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या भाजपच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बारामती लोकसभा मतदार संघ भाजप जिंकणार, असे विधान केले होते. फडणवीस यांनी बारामतीतदेखील कमळ फुलवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर बुधवारी बारामतीमधील राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या विधानांना जोरदार विरोध केला आहे.


विरोधकांनी बारामती पंचायत समिती, बारामती नगरपालिका आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी 'बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म कधी होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही', अशा आशयाचे फलक लावले आहेत. त्याखाली समस्त बारामतीकर असा उल्लेख केला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आत्ताच रंगताना दिसून येत आहे.

दरम्यान, शनिवारी भाजपची पुण्यात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाध्यक्ष अमित शाह म्हणाले की, "महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत आणि त्यातील एक जागा बारामतीचीही हवी." त्याआधी मुख्यमंत्र्यांनी यंदा भाजप राज्यात 43 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. 43 वी जागा ही बारामतीची असेल, असे भाकितही त्यांनी यावेळी केले होते.