औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी औरंगाबाद आणि नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. कर्जमाफी नको, तर कर्जमुक्ती हवी, असं उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत पुन्हा ठणकावून सांगितलं.


सरकारने दिलेले शब्द पाळला नसेल तर आघाडी आणि आपल्यात काय फरक? असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. शिवाय कर्जमाफीसाठी बँका आणि पीक विमा कंपन्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्यास त्यांना वठणीवर आणू, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.


आता निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेना राज्यभर फिरणार आहे. शिवसेनेचा जन्म तुमच्या मदतीसाठी झाला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.



अनेक ठिकाणी मोठं मोठ्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांना लाभ दिला नाही तर एकही दुकान सुरु ठेवणार नाही. विमा कंपन्यांनी लक्षात ठेवावं तुमची कार्यलये मुंबईत आहेत. अन्नदाता शेतकऱ्याच्या जीवाशी खेळू नका, अन्यथा तुम्हाला मुंबईतून पळवून लावू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.


येत्या आठवडाभरात पीकविमा योजनांचा निपटारा झाला नाही तर सर्व शेतकरी आणि त्यांची प्रकरणं मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार आहे. तर फसल विमा योजनेचा लाभ मिळाला नाही तर पंतप्रधानांकडे शेतकऱ्यांना घेऊन जाऊ, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिलं.