सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी अभिजीत बिचुकलेला जामीन मिळाला आहे  मात्र खंडणीप्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बिचुकलेला काल अटक करण्यात आली होती. सह दिवाणी न्यायाधीश आर व्ही पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. अभिजीत बिचुकलेला काल अटक करण्यात आली होती. सातारा पोलिसांनी अभिजीत बिचुकलेला सेटवरुन  अटक केली होती. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजेच अटकेच्या वेळी बिचुकलेने कोणताही विरोध केला नव्हता. दरम्यान अटक केल्यानंतर बिचुकलेने राजकीय स्वार्थासाठी 2015 सालचं जुनं प्रकरण उकरुन काढल्याचा आरोप केला होता. काल अटक केल्यानंतर आज न्यायालयात दाखल होण्यापूर्वी बिचुकलेचा रक्तदाब वाढला होता. रक्तदाब वाढल्याने बिचुकलेला सातारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते.  तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बिचुकलेला कोर्टात हजर केलं होतं. दवाखान्यात अभिजीत बिचुकले एबीपी माझाशी बोलताना म्हणाला होता की, "वकील संदीप संकपाळ यांचा मी 12 वर्षांपासून भाडेकरु आहोत. त्यांनी माझ्याकडून भाड्याचे पैसे घेतले होते. पण ही गोष्ट ते अमान्य करतात. त्यांनी 2015 सालमधील जुनी केस उकरुन काढली आहे. कोर्टाची दिशाभूल करुन त्यांनी माझ्याविरोधात अटक वॉरंट काढलं. यात नक्कीच राजकीय हस्तक्षेप आहे. राजकीय स्वार्थासाठी वकील संदीप संकपाळचा उपयोग करत आहे. त्यांना आमिष दाखवून माझ्याविरोधात भडकवलं आहे, याचा सोक्षमोक्ष लगेचच लागेल. कोर्टावर आपला विश्वास आहे." दरम्यान आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने तो स्पर्धेत कायम राहणार की इथेच त्याचा घरातील प्रवास संपणार, तसंच यावर कलर्स मराठी वाहिनी काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. अभिजीत बिचुकलेने बिग बॉसच्या घरातील सहस्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसलेला शिवीगाळ केली होती. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या 24 व्या भागात हा प्रकार घडला होता. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेला शोमधून हकालपट्टी करा, अशी मागणी  केली होती. अभिजीत बिचुकले 'बिग बॉस मराठी'च्या घरातील वादामुळे कायमच चर्चेत असतो, आता या नव्या वादाची त्यात भर पडली आहे. कोण आहे अभिजीत बिचुकले? - साताऱ्यातच मागासवर्गीय घरात बिचुकलेचा जन्म झाला - घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा  परंपरागत व्यवसाय - बिचुकले सातारा नगरपालिकेत कर्मचारी होता - पण सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला - त्यानंतर उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन - त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी जाहीर करणे - आणि त्यानंतर ऐनवेळी माघार घेणे हे प्रकार सुरु केले - उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली - पण कधीही 2 हजार मतांच्या वर त्याची मजल गेली नाही - यंदा त्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता - इतकंच काय त्यानं आपल्या पत्नीलाही निवडणुकीत उभं केलं - अभिजीत बिचुकलेवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत संबंधित बातम्या 'बिग बॉस'च्या शाळेत इव्हेंच्युअली बिचुकले गुरुजी देणार इंग्रजीचे धडे मी फक्त एकालाच घाबरतो, अभिजीत बिचुकलेला : उदयनराजे भोसले बिचुकलेंना 'बिग बॉस'मधून बाहेर काढा, भाजपच्या माजी नगरसेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीला Big Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात बिचुकले का बिथरले?