जालना : जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. जालना जिल्हा परिषद निवडणुकीत 22 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. मात्र 56 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता आलं नाही. त्यामुळे या वेळी अध्यक्ष पदाच्या निवडीवरून सत्येसाठी मोठं घमासान पाहायला मिळणार आहे.


भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर या  तीन बड्या नेत्यांचा प्रभाव असलेल्या जालना जिल्हा परिषदेवर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.

जालना जिल्हा परीषदेत 56 पैकी सर्वाधिक 22 जागा जिंकूनही भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे 7 बहुमतासाठी भाजपला आणखी 7 जागांची आवश्यकता आहे. त्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल.

या निवडणुकीत भाजपला 22, शिवसेनेला 14, राष्ट्रवादीला 13, काँग्रेसला 5 जागा मिळाल्या तर 2 ठिकाणी अपक्ष निवडून आले. निवडून आलेले दोन्हीही अपक्ष हे पुर्वाश्रमिपासून शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याने शिवसेनेला त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 16 झालं आहे. शिवसेनेचं संख्याबळ कमी असलं तरी सत्ता मिळवण्यासाठी भाजप सोडून इतर पक्षांशी युतीसाठी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.

जालना जिल्हा परिषदेत युती होण्याची शक्यता कमीच आहे. त्यात भाजपची अंतर्गत गटबाजी देखील समोर येऊ शकते. यावेळी जालना जिल्हा परीषदेचं अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशा पांडे हे दोघेही भाजपकडून अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे भाजपमधील एक गट दोघांपैकी कोणी एक अध्यक्ष झालं तर नाराज होऊ शकतो.

शिवसेना आपले 14 सदस्य आणि 2 अपक्ष उमेदवार अशा 16 जागेच्या संख्याबळावर अध्यक्षपद पदरी पाडून घेईल, आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन उपाध्यक्षपदाची ऑफर देऊ शकते, अशी चर्चा आहे.

जालना जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

एकूण सदस्य -56 (बहुमतासाठी-29)

  • भाजप-22

  • शिवसेना-14

  • राष्ट्रवादी-13

  • काँग्रेस-5

  • अपक्ष-2