सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळयाची सुंदर कलाकृती एका 'क्विल्ट' वर म्हणजेच 'गोधडी'वर साकारण्यात आली आहे. तब्बल 20 हजार 888 कापडी तुकडे, 288 रंगछटा आणि 19 बाय 8 फुटांचा थक्क करणारा राज्याभिषेक सोहळा सांगलीच्या महिला आर्किटेक्ट श्रुती दांडेकर साकारला आहे. सांगलीत मोठ्य दिमाखात या शिवराज्यभिषेक गोधडीचे अनावरण करण्यात आलं.
डिझायनर असणाऱ्या सांगलीच्या श्रुती दांडेकर गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक गोधडीला नव्या रुपात जगासमोर आणण्याचा काम करत आहेत. आजीबाईची समजली जाणारी गोधडी दांडेकर यांनी क्विल्टच्या रुपाने सातासमुद्रापार नेली आहे. आज त्यांच्या या गोधडीला म्हणजेच क्विल्टला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या रुपाने नवा आयाम मिळाला आहे. छत्रपतीचा इतिहास जगभर पोहोचावा या उद्देशाने श्रुती दांडेकर यांनी या कलाकृतीची निर्मिती केली आहे. यासाठी तब्बल 20 हजार 888 कोटी कपड्यांचे तुकडे शिवून ही 19 बाय 8 फुटांची ही गोधडी साकारली आहे. तर यामध्ये 288 रंगांच्या छटांचा वापर करण्यात आला आहे.
या क्विल्टमध्ये अगदी 3 मिमी इतक्या लहान कपड्यांच्या तुकड्याचा समावेश आहे. राज्याभिषेकच्या पेंटिंगप्रमाणे हुबेहूब कलाकृती या गोधडीमध्ये रेखीव स्वरुपात साकारली आहे. प्रत्येक गोष्ट याठिकाणी अत्यंत बारकाईने जोडण्यात आली आहे. ही गोधडी साकारण्यासाठी श्रुती दांडेकर यांना तब्बल दहा महिने आणि 807 तासांचा कालावधी लागला आहे. तर गोधडीवर शिवराज्याभिषिक साकारण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे यांचं मार्गदर्शन घेऊन सुरुवात केली. पुण्याच्या मनीषा अय्यर यांच्या स्टुडियो बानीमध्ये याचे संपूर्ण शिवणकाम केलं आहे.
आता ही क्विल्ट म्हणजेच गोधडी 25 ते 27 जानेवारी चेन्नई येथे होणाऱ्या इंडिया क्विल्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहे. फेस्टिवलमध्ये ही छत्रपतींच्या राज्याभिषेकाची गोधडी अर्थात क्विल्ट प्रमुख आकर्षण असणार आहे.
तत्पूर्वी सांगलीच्या आभाळमाया फाऊंडेशनेने श्रुती दांडेकर यांची ही कलाकृती आणि छत्रपतींच्या इतिहासाला सांगलीकरांच्या प्रथम समोर आणण्याच्या उद्देशाने आज मोठ्या दिमाखात शानदार सोहळ्यात अनावरण केलं. दांडेकर यांच्या कला शिक्षिकीच्या हस्ते यावेळी या भव्य दिव्य शिवराज्याभिषकाच्या सुंदर कलाकृतीचे अनावरण संपन्न झालं. ही कलाकृती पाहण्यासाठी सांगलीकरानी मोठी गर्दी केली होती.
काय आहे क्विल्ट अर्थात गोधडी?
- भारतात पूर्वीच्या काळी घरातील अनेक कापड्यापासून गोधडीची निर्मिती केली जाईची.
- अनेक छोट्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांना जोडून ठिगळे-ठिगळे दिसणारी ही गोधडी बनत असे.
- अत्यंत उबदार म्हणून गोधडीची ओळख आहे.
- घरातील जेष्ठ मंडळी या गोधडी बनवत असत त्यामुळे याला आजीबाईची गोधडी असे संबोधले जाते.
- अशी ही गोधडी काळानुसार लुप्त होत चालली आहे.मात्र या सांगलीच्या श्रुती दांडेकर यांनी हा गोधडीला आज नवे रुपडे दिली आहे.
- आज त्यांच्या गोधड्या परदेशात पोहचल्या आहेत.आणि क्विल्ट मध्ये पोर्ट्रेट करणे ही त्यांची खासियत असून परदेशात मोठी त्याला मोठी मागणी आहे.आता देशातही त्यांच्या या गोधडीला चांगली मागणी निर्माण झाली आहे.
- यामुळे इतर महिलांना ही कला शिकवण्यासाठी श्रुती दांडेकर या सांगलीबरोबर पुणे, मुंबई, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद येथे वर्कशाॅप घेतात.
- इतकेच नव्हे तर आता ही कला अमेरिकेतही शिकवणार असून फेब्रुवारी मध्ये त्या ‘गोधडी’ चे प्रशिक्षण द्यायला अमेरिकेला जाणार आहेत.