पुणे : पुण्यात सिंहगड भागात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं आहे. नवशा मारुती आणि चुनाभट्टीजवळ रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर आलं आहे. आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. तरी, सध्या पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे.


सिंहगड रस्त्यावरील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या टाक्या आज सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारात ओव्हर फ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर आलं. ही बाब पु. ल. देशपांडे उद्यानात वॉकिंगला आलेल्या लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल.

व्हॉल्व खराब झाल्यामुळे कामगारांना ते बंद करता आले नाहीत. परिणामी दोन तास रस्त्यावर पाणी वाया गेलं, अशी माहिती मिळत आहे. शिवाय आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरलं. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही झाली होती.

यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून आता रस्त्यावरील पाणी ओसरण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, पुण्यात पाणीटंचाई असताना अशाप्रकारे लाखो लिटर पाण्याची नासाडी होणं, यासाठी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.