Shivajirao Adhalarao Patil : शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil ) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात आली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच आहेत. ते शिवसेना उपनेता म्हणून कार्यरत असल्याचा खुलासा शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फेसबुकवरुन आढळराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा' अभिनंदन मुख्यमंत्री साहेब. असा आशयासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटोही आढळरावांनी टाकला आहे. या शुभेच्छा दिल्यानेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची थेट शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचं पाऊल उचलल्याचं बोललं जात होतं. शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सामना या मुखपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली होती. आढळराव पाटील यांची फेसबुक पोस्ट ही पक्षविरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे सकाळीच वृत्त समजताच आढळरवांना देखील धक्का बसला होता. मात्र, ते शिवसेनेतच असल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या वृत्तानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. काल रात्रीच उद्धव ठाकरेंशी आढळराव पाटील यांचे फोनवरुन बोलणं झालं होतं. त्यावरुन सकाळी पक्षातून हकालपट्टी होईल अशी पुसटशी कल्पनाही नव्हती, अशी पहिली प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली होती. शनिवारी रात्री फोनवरुन झालेल्या संभाषणात, जिल्ह्यातील काही पदाधिकारी आपणास रविवारी भेटायला येणार आहेत, याची कल्पना मी उद्धव ठाकरेंना दिली. त्यावेळी मला फेसबुकवरील शुभेच्छांबद्दल उद्धव ठाकरेंनी विचारलं. नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना मी फक्त शुभेच्छा दिल्याचं स्पष्टीकरणही त्यांना दिलं. शिवाय मंगळवार अथवा बुधवारी मुंबईत भेटायचंही आमचं ठरलं. मग काही तासातच माझी पक्षातून हकालपट्टी कशी काय होऊ शकते? बहुदा असं पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलं आहे. याची कल्पना स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना नसावी, असंही आढळराव पाटील यांनी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या: