Maharashtra Politics : शिवसेना बंडखोर आमदारांचे वास्तव्य असलेल्या गोव्यातील हॉटेलमधून तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे. बनावट ओळखपत्र प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. पणजी पोलिसांनी ही माहिती दिली. या तिघांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली. 


राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान आणि त्यांच्यासह आणखी दोन कार्यकर्त्यांना शनिवारी दुपारी अटक करण्यात आली. बनावट ओळखपत्राच्या आधारे हॉटेलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची हॉटेलकडून तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पणजी पोलिसांनी ही कारवाई केली. दुहान यांनी हॉटेल मध्ये घुसून बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी केली.  


शिवसेनेचे बंडखोर आमदार शनिवारी रात्री मुंबईत परतले. गुवाहाटीमधून या आमदारांना गोव्यातील हॉटेलमध्ये नेण्यात आले होते. गुवाहाटीप्रमाणे गोव्यातही बंडखोर आमदारांसाठी सुरक्षा व्यवस्था तैनात होती. 


कोण आहेत सोनिया दुहान 


सोनिया धुहान या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. वर्ष 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी या आमदारांची सुटका करण्यात सोनिया दुहान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोनिया धुहान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची सुखरुपपणे सुटका केली होती. त्यामुळे सोनिया धुहान यांनी गोव्यातही हाच प्रयत्न केला होता का, याची चर्चा सुरू झाली आहे.