Jyoti Waghmare : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून टीका होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राजकीय वास असल्याचा आरोप शिवसेनेकडून (Shiv Sena) करण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी या प्रकरणावरून शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. कोण कोणाची तुतारी वाजवत आहे, हे आता संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलंय, असे त्यांनी म्हटले आहे.
ज्योती वाघमारे म्हणाल्या की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मराठी समाजाची कुठलीही मागणी असले, त्याबाबत सरकार सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या सतत बदलत राहिल्या आहेत. मुख्यमंत्री असूनही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जरांगे पाटलांना दोन वेळेस भेटायला गेले. सगळ्या मागण्या पूर्ण होऊन सुद्धा जर पुन्हा आंदोलनाची भाषा होत असेल तर मग या आंदोलनाचा उद्देश हा आरक्षण आहे की राजकारण आहे. या विचार मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्राने करावा, असे त्यांनी म्हटले.
...तर त्या लोकांना मराठा समाजबांधवांनी ओळखावे
जे लोक पन्नास वर्षानंतर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून रायगडवर तुतारी वाजवायला गेले. त्यांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी करून दाखवले. आंदोलनाच्या पाठीमागून जर कोणी मराठा बांधवांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न करत असेल. तर त्या लोकांना मराठा समाजबांधवांनी आता ओळखावे, कोण कोणाची तुतारी वाजवत आहे, हे आता संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलंय, स्वतःकडे सत्ता नसल्यानंतर जाती धर्मात भेद घडवू नये, आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये, अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली आहे.
मनोज जरांगेंचे आमरण उपोषण स्थगित
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेले आपले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १६ दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु होते. मनोज जरांगे म्हणाले की, मी आमरण उपोषण स्थगित करत आहे. मात्र साखळी उपोषण सुरु करत आहे. मी आता गावागावात जाऊन मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला इतरांना भेटण्याचा मुलभूत अधिकार आहे. मी तुमच्याकडे येत आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा