मुंबई : राजकारणात सगळ्यांना पुढे जायचं असतं. त्यामुळं मंत्री व्हावं ही माझी इच्छा असल्याचे मत शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केलंय. परंतु, त्यांनी केलेल्या ट्वविटमुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच ट्विस्ट तयार झालाय. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ट्विट केल्यापासून संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु, आपण मंत्रीपदासाठी नाराज नसल्याचे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलय. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटात एकटे शिरसाटच नाराज नाहीत तर त्यांच्यासारखेच अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे समोर आले आहे. यातील काही आमदारांनी ही नाराजी उघड-उघड बोलून दाखवली आहे तर काहींनी छुप्या पद्धतीने नाराजीला वाट करून दिलीय. 


संजय शिरसाट यांच्या या ट्विटनंतर आता शिंदे गटात नेमकं काय चाललंय? काही आमदार खुश आहेत तर काही परतीच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी बंडखोरांना आवरणं कठीण झालय का? अशी चर्चा आता राजकीय वातावरणात रंगत आहे. 


संजय शिरसाट यांचं ट्वीट काही सेकंदांसाठी आलं आणि एकच चर्चा सुरु झाली, ती म्हणजे खरंच शिरसाट नाराज आहेत का? ते पुन्हा शिंदे गट सोडून उद्धव ठाकरेंसोबत जाणार का? अशा एक ना अनेक चर्चा सुरु झाल्या पण त्या चर्चांना संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत पुर्णविराम दिलाय. परंतु, त्यांच्या या ट्विटमुळे आता शिंदे गटात एकटे शिरसाटच नाराज आहेत का? पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले प्रताप सरनाईक, भरत गोगावले, बच्चू कडू, गीता जैन, बालाजी किणीकर, यामिनी जाधव, सदा सरवणकर, प्रकाश अबिटकर आणि अनिल बाबर यांच्यासारखे अनेक लोक नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात. 


एकनाथ शिंदे यांनी बंड करून आता बराच कालावधी लोटला आहे. बंडखोरी केलेल्या 9 आमदारांनी त्यांच्या मंत्रिंडळात शपथ देखील घेतली आहे. परंतु, उर्वरीत आमदार अद्याप देखील वेट ॲंड वॅाचच्या भूमिकेत आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्यामुळे आमदारांमध्ये कूरकूर सुरु झाली आहे.  प्रत्येक जण एकनाथ शिंदे यांच्याकडे अपेक्षेने पाहू लागले आहेत. शिवाय दुसऱ्या टप्प्यातील 
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची वाट बाकीचे पाहत आहेत. आमदार आता एकनाथ शिंदे यांची पाठ सोडत नाहीत. काही आमदार मतदारसंघाऐवजी शिंदेसोबतच कायम दिसत आहेत. त्यामुळे पहिला मंत्रिमंडळ विस्तार हा शिंदेसाठी तसा तापच बनला आहे, असं बोललं जातय.  


महाविकास आघाडीतील शिंदे गटासोबत आलेले मंत्री
उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे आठ विद्यमान मंत्री एकनाथ शिंदेंसोबत आले आहेत. यामध्ये दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई आणि राजेंद्र यड्राव्हकर यांचा समावेश आहे. तर आधी मंत्री असलेले संजय राठोड देखील शिंदे गटासोबत आले आहेत. 


शिंदेंसोबत प्रमाणिकपणे बंडात सहभागी 


संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, संजय गायकवाड, संजय रायमूलकर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, सुहास कांदे, अनिल बाबर, प्रकाश अबिटकर, असे अनेक आमदार शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले आहेत.  


एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या 50 आमदारांनी बंडखोरी केली आहे. परंतु, शिंदेंच्या वाट्याला फक्त 18 मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे.  त्यात आता कोणा कोणाला मंत्रीपद द्यायचा हा शिंदेंसमोर मोठा प्रश्न आहे. शिवाय 18 जणांना मंत्रीपद दिल्यानंतर उर्वरित आमदारांना सोबत कसे ठेवणरा हा देखील त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 


मातोश्रीची दारे उघडी
दरम्यान, जस-जसा मंत्रिमंडळ विस्तार जवळ येत होता, तस-तशी शिंदे गटातील आमदारांची नाराजी सोमोर येत होती. त्याचवेळी बंडखोरी केलेल्या आणि अजूनही परत येण्याची इच्छा असणाऱ्या आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे कायम खुले असतील असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अनेकवेळा सांगितले. शिवाय उद्धव ठाकरे यांनी देखील अनेकवेळा असे म्हटले आहे. तर नाराज आमदारांसाटी महामंडळांची दारं उघडी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे हे नाराज आमदार महामंडळ स्वीकारतील की? उघड्या असलेल्या मातोश्रीचा दरवाजा ठोठावतील हे येणारा काळच ठरवेल. कारण इच्छुकांची संख्या मोठी आहे. 


 एकनाथ शिंदेंसमोर तिढा
अपक्षांसह  50 आमदार शिंदेसोबत गेले. पण बाळासाहेबांपासून काम करत आलेले शिवसेनेचे नेते देखील शिंदेंच्या पाठिशी उभे राहिले. रामदास कदम यांनी आपलं दुःख सर्वांसमोर मांडलं, आनंदराव अडसुळ विजय शिवतारे यांनीही शिंदेना साथ दिली विधानपरिषदेचे माजी आमदारही शिंदेसोबत गेले. त्यामुळे या जुन्या शिवसैनिकांनाही एकनाथ शिंदेंकडून मोठ्या अपेक्षा आहेत.  
या जुन्या नावांमुळेही नव्यांमध्ये नाराजी पसरू शकते. त्यामुळेच आता नेमकं काय करायचं हा मोठा तिढा एकनाथ शिंदेंसमोर आहे. 


महत्वाच्या बातम्या


संजय शिरसाटांकडून 'कुटुंबप्रमुख' म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदेंना इशारा? 


Sanjay Shirsat : ते ट्वीट टेक्निकल प्रॉब्लेम, संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण, कॅबिनेट मंत्रीपदाच्या मागणीवर ठाम 


Aurangabad: कॅबिनेटसोबतच पालकमंत्रीपदही हवं; शिरसाटांच्या भूमिकेने 'भुमरे समर्थक' गोंधळात