Amit Thackeray In Pune:  संजय राऊत अनेकांना सगळं पुरवतात. रोज पत्रकार परिषदा घेतात आता मात्र ते तुरुंगात आहे. त्यामुळे मला संजय राऊत समजू नका, असं मोठं विधान मनसे नेते अमित ठाकरे यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.  गृहमंत्री पद दिल्यास सत्तेत सहभागी होणार, असं वक्तव्य मनसे नेते अमित ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर अमित ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गृहमंत्री होणार ही अफवा होती. पण पुढचे वीस दिवस मला पत्रकार याबाबतच विचारत होते. ही बातमी खोटी आहे, हे सांगून मी थकलो होतो. त्यामुळे गृहमंत्री पद दिल्यास सत्तेत सहभागी होणार असल्याचं विधान केलं होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


मी केलेल्या विधानानंतर 20 दिवस मला एकच प्रश्न विचारला गेला होता. मात्र मला कोणाच्या मंत्रिमंडळात नाही तर मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसायला आवडेल. ते सांगतील तेच मी करेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अनेक नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आणि विकास कामांसाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. मी मात्र विद्यार्थ्यांसाठी दौरा आखला आहे. रोजगार, आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा या समस्या विध्यार्थ्यांना भेडसावत आहेत. या सोडविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची शाखा असायला हवी. माझा आणि त्यांचा संपर्क व्हायला हवा. यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.


मी कधीच राजकारणात आलो नसतो


सध्या अनेक तरुण राजकारणात येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मी जर राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात कधीच आलो नसतो. मला लोकांसाठी काम करायला आवडतं. पण ही आवड असली तरी सध्याच राजकारण पाहता मी कधीच राजकारणात आलो नसतो. मात्र माझ्यासाठी राज ठाकरेंनी प्लॅटफॉर्म तयार करून दिलं आहे. त्यामार्फत मी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, असंही ते म्हणाले. युवकांनी माझ्यावर विश्वास ठेवून राजकारणात यावं, असा विश्वास देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.


सध्या जे काही राजकारणात सुरु आहे त्याबाबत माझं काहीच मत नाही आहे. माझा फोकस मला माहित आहे. मला महाराष्ट्रातील विद्यार्थांसाठी काम करायचं आहे. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे मला लक्ष द्यायचं आहे आणि त्यावर तोडगा काढायचा आहे. त्यासाठी मी त्यांना माझा नंबरही देतो आहे. त्यामुळे राजकारणावर बोलण्यापेक्षा मी विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार असल्यातं त्यांनी सांगितलं आहे.