Sanjay Raut : मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलेय का? असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. त्या भेटीवरुन चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला होता. शिवसेना खासदार संजय राऊत हे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. याला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
मी शिवसेनेमध्ये असताना शरद पवार यांच्यासोबतचे प्रेमाचे संबंध होते, त्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन करु शकलो, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. तुम्ही मती भ्रष्ट झाली आहे हे माहिती आहे. पण तुमची मती इतकी भ्रष्ट झाली तर राज्यातील जनतेला तुमच्या एकंदरीत मानसिक आरोग्याविषयी शंका आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
राज्यात भाजपचं सरकार न आल्यानेच खोट्या कारवाया करत सुटले आहेत. तुम्ही राजकारणालते मर्द असाल तर समोरासमोर येऊन लढा. केंद्रीय यंत्रणेचा शिखंडीसारखा वापर करुन मागे वार करु नका, असा टोला संजय राऊत यांनी भाजपावर लगावला. आम्ही शिवसैनिक, आमचं आयुष्य शिवसेनेत आणि बाळासाहेबांसोबत गेलं आहे. एका मर्यादेपर्यंत संयम पाळला, आता खूप झालं. शिवसेनेच्या वाघाला यांनी डिवलचलंय असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.
राज्यपाल हे भाजपचे शाखाप्रमुख आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही असं विरोधकांनी समजू नये, असाही इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला. आयएनएस विक्रांतच्या निधीत राष्ट्रभक्तीच्या नावावर सोमय्या पिता पुत्रांनी कोट्यवधी रुपये गोळा केल्याचा आरोप पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केला. पीएमसी बँकेच्या माध्यमातून हा पैसा किरीट सोमय्यानी व्हाईट केल्याचा आऱोपही राऊत यांनी केला.