Shiv Sena MP Sanjay Raut On Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांचा (Sambhajiraje Chhatrapati) विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे, असं शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. आम्ही 42 मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार होतो, असंही संजय राऊत म्हणाले. तसेच, संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं एवढीच आमची अपेक्षा होती, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. संभाजीराजेंना राजकीय पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. कारण यापूर्वीही अनेक लोकांनी, तसेच जे राजघराण्यातील आहेत, त्यांनीदेखील राजकीय पक्षात प्रवेश केला असून राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनीही शिवसेनेच्या नावावर निवडणूक लढवावी  असंही राऊत म्हणाले आहेत. 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "संभाजीराजे छत्रपतींचा विषय आमच्याकडून संपलाय". तसेच, राज्यात राज्यसभा निवडणुकीवर गोंधळ सुरु आहे. अशातच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संजय राऊतांना इशाराही देण्यात आला आहे. संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्यानं विरोध करताना दिसत आहेत. 2024 ला तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेलच पण छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढवणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं राऊतांना दिला आहे. यावर बोलताना राऊतांनी याप्रकरणात संजय राऊतांचा व्यक्तीगत काय संबंध आहे? तसेच, शिवसेनेचा काय संबंध आहे? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, जे अशाप्रकारची वक्तव्य करतात त्यांनी या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा आम्ही संभाजीराजे छत्रपतींना देण्यासाठी तयार झालो. तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते? हे सांगा."


"निवडणुकीसाठी 42 मतांचा कोटा लागतो. ही मतं आम्ही छत्रपती संभाजीराजेंना द्यायला तयार आहोत. पण आमची भूमिका, अट नाही. आमची भूमिका इतकीच होती. ही जागा शिवसेनेची आहे. आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा. छत्रपती किंवा त्यांच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. यापूर्वी स्वतः थोरले शाहू महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर मालोजीराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. ते आमदार होते. स्वतः संभाजीराजे छत्रपतींनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि पराभूत झाले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षात छत्रपतींच्या घराण्यातील कोणी जात नाही. हा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे, जो चुकीचा आहे. देशभरात अनेक राजवंशातील प्रमुख घराणी कोणत्या ना कोणत्या पक्षातून आपलं सामाजिक कार्य पुढे नेत आहेत.", असं संजय राऊत म्हणाले. 


"42 मतं संभाजीराजे छत्रपतींना देऊन राज्यसभेवर पाठवण्याचं उद्धव ठाकरेंनी नक्की केलं होतं. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही झाली होती. त्यांच्या समर्थकांनी 15 दिवसांतल्या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत.", अशा शब्दांत संजय राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसेच, यावेळी बोलताना कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार आमचे सहावे उमेदवार आहेत, असा पुर्नरुच्चार राऊतांनी केला आहे.