सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. "बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार," अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बनपुरी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात खोत बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणाले की, "बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे. हा माणूस ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असणार. एवढा बिलंदर माणूस राजकारणात पाहायला मिळणार नाही."
पवारांवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेचं खोत यांच्याकडून कौतुक
अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर सर्वच स्तरांतून तिच्यावर टीकेचा भडीमार झाला. महाविकास आघाडीतील पक्षांसह भाजपमधील काही नेत्यांनीही तिला समज दिली आहे. अशात आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. 'केतकीचा मला अभिमान आहे,' असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी तिची पाठराखण केली.
याचवेळी सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारकडे उपरोधिक मागणी केली. यंदा महाराष्ट्रभर हर्बल तंबाखूचा पेरा होऊ द्या, आम्हाला सरकारने हर्बल तंबाखूचे बियाणे द्यावे, एकदा आमची पण गरिबी हटू द्या, असं सदाभाऊ खोत म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाकडे गांजा सापडला. यासाठी त्यांना तुरुंगवास देखील झाला. परंतु यावरु नवाब मलिक यांनी एनसीबी जोरदार हल्लाबोल केला. एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि हर्बल टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब गंभीर असल्याचं ते म्हणाले होते. त्यावरुन नवाब मलिक यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं. याच हर्बल टोबॅकोवरुन सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारची फिरकी घेत उपहासात्म टोला लगावला.
मुख्यमंत्रिपदासाठी सर्वस्व गहाण ठेवले : किरीट सोमय्या
दरम्यान या मेळाव्यात बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचं लक्ष्य केलं. "महाराष्ट्रात मोदींच्या नावावर ज्यांनी मते घेतली त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी आपले सर्व गहाण ठेवलं. मोदी आणि फडणवीसांच्या नावावर मतं मागून निवडून आलेल्या नेत्यांनी खुर्चीसाठी इमान विकलं," असं सोमय्या म्हणाले. "मोदी सरकारने नदीजोड प्रकल्प राबवला आणि शेतीला पाणी दिलं. फडणवीसांनी त्यांच्या काळात राज्यात हेच काम केलं. ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार आणलं पाहिजे. या सरकारचा रोज एक घोटाळा होत आहे. कशाचा कशाशी मेळ नाही. राज्यात आता पवार-ठाकरे यांचे माफिया आणि वसुली सरकार आहे. या वसुली सरकारपासून राज्याला मुक्त करण्याचा आम्ही विडा उचलला आहे. तो पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," असा इशारा सोमय्या यांनी दिला.
उद्या निवडणूक झाल्या तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार दिसेल : प्रवीण दरेकर
"तुम्हाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण महाविकास आघाडी सरकार लबाडी करुन ते या लबाडाच्या अवताला जुंपून सत्तेत आले. उद्या जर निवडणूक झाल्या तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार दिसेल," असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. "गेल्या 25वर्ष जो विकास झाला नाही, तो आम्ही 5 वर्षात केला. ठाकरे सरकारच्या काळात विकास रखडला. या सरकारने ब्लॅकच्या लोकांना व्हाईट केलं. केवळ नौटंकी चालू आहे. यांना शेतकऱ्याचे कौतुक आणि डोळे पुसायला वेळ नाही. मग छत्रपतींचं नाव घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही. आम्ही नवखे असलो आम्हाला पवारांचे डावपेच कळत आहेत. लबाडाचे राजकारण आजपर्यंत तुम्ही केले," अशी टीका दरेकर यांनी केली.