अहमदनगर : एकीकडे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना दुसरीकडे मात्र निष्ठावंत शिवसैनिक मात्र सेनेच्या मंत्र्यांवर नाराज असल्याचं चित्र समोर आलं आहे. प्रदीप हासे असं या शिवसैनिकाचं नाव असून ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील म्हाळादेवी या गावाचे आहेत. 30 वर्षांपासून निष्ठावंत शिवसैनिकाने दोन वेळा शिवसेनेच्या मंत्र्यांना विकासकामाच्या उद्घाटनासाठी विनंती केली. मंत्र्यांकडून दोन वेळा तारीख मिळून अचानक रद्द केली. तिसऱ्यांदा पुन्हा तेच झाल्यानंतर मंत्र्याविना तीन कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन पार पाडण्यात आलं.


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील म्हाळादेवी ग्रामपंचायत. याच गावातील प्रदीप हासे हा निष्ठावंत शिवसैनिक. 1992 पासून विद्यार्थी सेनेतून काम सुरु केलेल्या या युवकाने 30 वर्षापासून गावात शिवसेनेची सत्ता राखली. एवढंच नव्हे तर मागील पंचवार्षिकमध्ये बिनविरोध निवडणूक करुन शिवसेनेचा भगवा फडकवला. यावेळी सुद्धा शिवसेनेची सत्ता गावात असल्याने प्रदीप हासे यांनी 3 कोटींच्या विकासकामाचं उद्घाटन करण्यासाठी सेनेच्या मंत्र्यांना विनंती केली. मात्र दोन वेळा तारीख मिळून अचानक रद्द झाल्याने कार्यक्रम स्थगित केला. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा तारीख मिळाल्याने पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंधारण मंत्री यांचे मोठे मोठे फ्लेक्स तालुक्यात लावत कोणशीला सुद्धा बसवली. परंतु ऐनवेळी मंत्र्यांनी कामात व्यस्त असल्याचं सांगत कार्यक्रमाला येण्याचं टाळलं. मात्र तयारी पूर्ण झाल्याने मंत्र्यांविनाच कार्यक्रम पार पाडण्याची वेळ या शिवसैनिकावर आली.


पतीच्या खांद्याला खांदा लावत त्यांच्या पत्नी सुनीता हासे यांनी समाजकार्यात मदत केली. मात्र पतीच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला शिवसेनेचा एकही मंत्री न फिरकल्याने त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली तर ग्रामस्थांनी सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांनी दाखविलेल्या गैरहजेरीवरुन टीका केली. या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाला तालुक्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित असताना स्वतःच्या मतदारसंघातील शिवसेना खासदार ही आले नाहीत. मात्र नाशिकचे सेना खासदार हेमंत गोडसे यांनी हजेरी लावली खरी पण ती ही अवघी 15 मिनिटे..


राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना 30 वर्षांपासून सेनेचं काम करत, पक्ष वाढवण्यासाठी कष्ट करणाऱ्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांसाठी पक्षाच्या मंत्र्यांना वेळ मिळत नसेल तर आगामी काळात शिवसेना कोणाच्या भरवशावर वाढणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.