Shiv Sena MP Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राची माती ही गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना माफ करणार नाही, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची फोनवरुन चर्चा झाल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. याबाबत बोलताना बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल, असं ते म्हणाले. तसेच, फक्त मनसेच (MNS) नाही, तर एमआयएममध्येही (MIM) ते जाऊ शकतात, असा टोलाही राऊतांनी लगावलाय. रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 


शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत म्हणाले की, "मी बाप काढला अशा चर्चा सुरु आहेत. आताच मी एक ट्वीट केलंय गुलाबराव पाटलांचं. तुम्हा पाहा. त्या भाषणात ते स्वतःच बाप बदलण्याची भाषा करत आहेत. जे लोक बाप बदलतात, त्यांच्यासाठी त्या व्हिडीओमध्ये गुलाबराव पाटलांनी जे वक्तव्य केलंय, ते खरंच मार्गदर्शक आहे. गुवाहाटीमध्ये जे लोक बसलेत, त्या सर्वांसाठी गुलाब पाटलांचं जे भाषण मी ट्वीट केलंय, ते पाहण्यासारखं आहे. लोकं कसे आपला बाप बदलतात, बेईमान होतात, पक्षात खातात, पितात मोठे होतात आणि आपला बाप बदलतात. आम्ही बाप बदलणाऱ्यांपैकी नाही, हे गुलाबराव आपल्या भाषणात म्हणाले आहेत." 


मी फक्त सत्य बोललोय. तुमचा आत्मा मेलाय म्हणून तुम्ही जिवंत मुडदे बनलायत : संजय राऊत 


"जे लोक 40 वर्ष पक्षात राहतात आणि त्यानंतर पक्ष सोडतात, त्यांचा आत्मा मेलाय. मग काय उरतं? जिवंत मुडदे. हे शब्द राममनोहर लोहिया (Ram Manohar Lohia) यांचे आहेत. जिंदा कौमें पाँच साल इंतजार नहीं करती, हेदेखील राममनोहर लोहिया यांचं महत्त्वाचं वक्तव्य. हे शब्द नवे नाहीत महाराष्ट्र आणि देशासाठी. पण समजून घ्या तुमची बुद्धी आहे, ती कुंठित झाली आहे. तुमचा संपर्क तुटलाय समजाशी, लोकांशी, महाराष्ट्राशी त्यामुळेच तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करताय. मी कोणाचाच आत्मा आणि भावनांना ठेच पोहोचवली नाही. मी फक्त सत्य बोललोय. तुमचा आत्मा मेलाय म्हणून तुम्ही जिवंत मुडदे बनलायत."


बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ही ऐतिहासिक गोष्ट : संजय राऊत


"आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्याचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल.", असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. 


उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. हा मोठा धक्का आहे का? याबाबत राऊतांना विचारलं असता ते म्हणाले की, "हा धक्का नाही. उदय सामंत सर्वांचे जवळचे होते. दीपक केसरकर आमचे जवळचे आहेत. तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती आमच्या जवळचा आहे. एकनाथ शिंदे आमच्या सर्वात जवळचे आहेत. आमच्या घरात 8 दिवसांत एकदातरी आम्ही भेटायचो. चहा प्यायचो, खायचो, चर्चा करायचो."


ही कायदेशीर लढाई आहे. लीगल फाईट आणि स्ट्रीट फाईट... रस्त्यावरची लढाई आणि कायद्याची लढाई... ही दोन्ही बाजूंनी होत राहील. या दोन्हीमध्ये शिवसेनाच जिंकेल, असा विश्वासही संजय राऊतांना व्यक्त केला आहे. तसेच, काल एकनाथ शिंदे यांनी दाऊद इब्राहिम संदर्भात केलेल्या ट्वीटबाबक बोलताना संजय राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत संबंध जोडणाऱ्या लोकांशी कसे काय जाऊ शकता? ज्यांचा हात पुलवामा घडवून आणण्यामध्ये होता, त्यांच्याशी तुम्ही कसा संबंध जोडू शकता? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच, काही लोकांना गुवाहाटीत जबरदस्तीनं डांबून ठेवलंय, ते परत येतील अशी आमची अपेक्षा असल्याचंही संजय राऊत यावेळी म्हणाले.