Aurangabad News: शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिंदे गटात सामील न होता उद्धव ठाकरेंच्यासोबत ठामपणे उभा राहणारे कन्नड मतदारसंघाचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. त्यातच आता राजपूत यांनी एका लग्नात हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहे.
आमदार उदयसिंग राजपूत यांनी रविवारी आपल्या मतदारसंघातील एका लग्न समारंभात हजेरी लावली होती. यावेळी डीजेच्या तालावर वरात निघाली होती.मागे रथात वधू-वर बसले होते. दरम्यान कार्यकर्त्यांनी राजपूत यांना डान्स करण्याचा आग्रह केला. यावेळी 'मैं हूँ डॉन' हे गाणं डीजेवर सुरु होतं. मग काय राजपूत यांनी 'मैं हूँ डॉन' गाण्यावर जोरदार ठेका धरला. आमदार डान्स करत असल्याने त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. तर काही जणांनी त्यांच्यासोबत डान्स करण्याचा आनंद लुटला. यावेळी राजपूत यांनी सुद्धा मनसोक्तपणे डान्स केला.
शिंदे गटाकडून 50 कोटींची ऑफर
शिंदे गटात सहभागी होण्यासाठी 50 कोटींहून अधिकची ऑफर मिळाल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. राजपूत यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्व पक्ष अधिक सावध झाले आहेत. एवढंच नाही तर दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचं फुटेजही असल्याचा दावा उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. मात्र 100 कोटी दिले तरीही आपण गद्दारी करणार नाही, असंही उदयसिंग राजपूत म्हणाले आहेत.
ऑडिओ क्लिप व्हायरल
उदयसिंग राजपूत हे औरंगाबादच्या कन्नडचे आमदार आहेत. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता शिवसेनेतल्या बंडाला एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. आमदार फोडण्यासाठी 50 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. एका शिवसेना कार्यकर्त्यासह बोलतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. त्यात ते ऑफर स्वीकारली नाही. कारण मी तत्त्व आणि निष्ठेला महत्त्व देणारा आहे. शिंदे मला मंत्रीही करू शकतील, पण मला पदाचा हव्यास नाही. मी शिवसेनेतच राहणार आहे.