Sanjay Raut Tweet : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल सभेत बंडखोर आमदारांवर जोरदार प्रहार केल्यानंतर आज पुन्हा एक व्हिडीओ ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. संजय राऊतांनी ट्वीट करत म्हटलंय की, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
व्हिडीओत काय म्हटलंय
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका भाषणाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत गुलाबराव पाटील म्हणत आहेत की, शिवसेनेत पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेत रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय. हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. 'कतलिया कही साप बदल लेते है, पुण्य की आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है', असं गुलाबराव पाटील या व्हिडीओत म्हणत आहेत.
सामनाच्या अग्रलेखात भाजपवर जोरदार टीका
सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'नाच्यांची 'वाय झेड'' या मथळ्याखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. राजकीय विरोधकांविरोधात खोटे आरोप करणाऱ्या , धमक्या देणाऱ्या भाजपपुरस्कृत मंडळींना 'वाय'पासून 'झेड'पर्यंत सुरक्षा देण्याचा सपाटाच केंद्रातील भाजप सरकारने लावला आहे, असा थेट आरोप सामनाच्या माध्यमातून शिवसेनेनं केला आहे.
अग्रलेखात म्हटलं आहे की, देशभरात अशा 'वाय'वाल्यांची फौजच त्यांना उभी करायची आहे काय? त्यांच्या याच फौजेत आता गुवाहाटीमध्ये असलेल्या 15 गद्दार 'नाच्यां'ची भर पडली आहे. त्यांनाही केंद्राने 'वाय प्लस' सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय केंद्रीय सुरक्षेची 'वाय झेड' करणारा तर आहेच, शिवाय गुवाहाटीत सुरू असलेल्या महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत सुरू असल्याचा पुरावा देखील आहे. भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचे पितळ त्यामुळे पूर्णपणे उघडे पडले आहे, असं लेखात म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
बंडखोर आमदारांच्या गावात 'माझा' : गुलाबराव पाटील यांच्या गावातील शिवसैनिक कुणाच्या बाजूनं?
'महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत'; बंडखोरांना 'नाच्यांची' उपमा देत सामनातून हल्लाबोल