नवी दिल्ली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करायला तयार होते, त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक तास चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला. शिवसेनेच्या 12 खासदारांनी आज वेगळा गट तयार करत असल्याचं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं. त्यानंतर त्यांनी हे गौप्यस्फोट केले. 


युती करण्याबाबत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची एक तास चर्चा
शिवसेना भाजप युती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक तास चर्चा झाल्याचं खासदार राहुल शेवाळे सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, त्यावेळी ही चर्चा झाल्याचं स्वत: उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं राहुल शेवाळे म्हणाले.


युती करण्यासाठी मला चर्चा करायला सांगितली
शिवसेना-भाजप युतीसाठी उद्धव ठाकरे तयार होते. त्यांनी मला देवेंद्र फडणवीस यांच्याशी युतीची चर्चा करायला सांगितली होती. पण नंतर उद्धव ठाकरे यावर काही बोलले नाहीत. 


युतीबाबत उद्धव ठाकरे आग्रही, त्यांनी ग्रीन सिग्नल दिला
एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेचे आमदार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांना वर्षावर बोलावलं. तिथे झालेल्या पहिल्या बैठकीत सर्व सेना खासदारांनी आमदारांची भूमिका बरोबर आहे असं सांगत उद्धव ठाकरेंना विनंती केली आपण भाजपसोबत जायला हवं. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवणार असतील तर आमदारांची भूमिका मान्य करायची माझी तयारी आहे. भाजपने तसा निर्णय घेतला तर मी त्या निर्णयाचं स्वागत करेन. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यासाठी तयार आहेत असंच सर्व खासदारांना वाटलं.


नंतरच्या बैठकीत मविआसोबत एकत्र राहू असं उद्धव ठाकरे म्हणाले
त्यानंतरच्या बैठकीत आपण मविआसोबत आहोत, एकत्र राहायला पाहिजे, एकत्र निवडणूक लढवली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र त्याला सर्व खासदारांनी विरोध केला होता. भाजपसोबत युती करुन आपण निवडून आलो आहोत त्यामुळे आपण भाजपसोबत राहायला हवं असं खासदारांनी मत मांडलं.


एनडीएमधून आम्ही बाहेर पडलो नाही, आम्ही एनडीएचेच घटक
आम्ही भाजपसोबत युती मोडली, पण एनडीएमधून बाहेर पडलो नाही. आम्ही तसं पत्र दिलं नाही. आम्ही आजही एनडीएचा घटक आहोत. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण आम्ही एनडीएमधून बाहेर पडल्याचं पत्र दिलं नव्हतं. तसेच आम्ही यूपीएमध्ये आहोत असंही पत्र दिलं नाही.


आम्ही गटनेता बदलला, भावना गवळी या पहिल्यापासूनच प्रतोद
आम्ही आता फक्त गटनेता बदलला आहे. भावना गवळी या पहिल्यापासूनच प्रतोद आहेत. त्यांचा व्हिप सर्व 18 खासदारांना लागू असेल. आम्ही एनडीएचा घटक असून उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांनाच पाठिंबा देत आहोत असंही ते म्हणाले.