मुंबई: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संबंधित (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Suresh Prabhu) यांची उलटतपासणी घेतली. त्यामध्ये त्यांनी सुनील प्रभूंना अनेक प्रश्न विचारले. शिवसेनेमध्ये ठाकरे कुटुंब सोडून कुणालाही शिवसेनाप्रमुख होता येतं का असा प्रश्न जेठमलानी यांनी विचारल्यानंतर सेनेच्या घटनेमध्ये जे आहे त्यानुसार नियुक्ती केली जाते असं उत्तर सुनील प्रभू यांनी दिलं. तसेच शिवसेनेची घटना त्यांच्या विचारधारेशी विरूद्ध अशा पक्षाशी युती करण्याची मुभा देते का असा प्रश्नही जेठमलानी यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना सुनील प्रभू यांनी हो असं उत्तर दिलं. 


गुरुवारी दुपारनंतरच्या सुनावणीत काय झालं? 


जेठमलानी- प्रतिवादी आमदारांना त्यांच्या कथित पक्षविरोधी कारवायांसाठी आपले म्हणणे मांडण्याची त्यांना वेळ दिली होती का?


सुनील प्रभू- मला आठवत नाही. 


जेठमलानी- प्रतिवादी आमदारांनी दिनांक 21 जून ते 30 जून 2022 दरम्यान जर त्यांनी पक्षविरोधी कृत्य केले असेल तर त्यांना 1 जुलै 2022 पक्षाच्या पदावरून काढणे आवश्यक होते का?


प्रभू - पक्ष विरोधी कारवाई केली तर हटवणे आवश्यक आहे. 


जेठमलानी - आपल्या मते शिवसेनेची घटना ही ठाकरे कुटूंब सोडून इतर कोणालाही पक्षप्रमुख करू शकते का? किंवा इतर कोणी पक्षप्रमुख पदावर बसू शकत का? 


प्रभू - रेकॉर्ड वर आहे. 


जेठमलानी - शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार आपल्यासारख्या पात्र सदस्यालासुद्धा पक्षप्रमुख होता येऊ शकत का? या पदावर बसता येऊ शकत का ?


प्रभू - घटनेमध्ये जे आहे त्यानुसार नियुक्ती केली जाते. 


जेठमलानी - शिवसेना पक्षाची घटना असं होऊ देईल का ?


प्रभू - प्रतिनिधी सभा बोलवून त्यामध्ये हे सगळं ठरवलं जाते की पक्षप्रमुख पदावर कोण असणार.


जेठमलानी- भारतीय संविधानातील 10 व्या अनुसूची अनुषंगाने आमदारांच्या आपात्रेबाबत शिवसेना घटनेत काही तरतूद आहे का ?


सुनील प्रभू- ऑन रेकॉर्ड आहे.


जेठमलानी - अमादारांबाबत अपात्रता याचिका दाखल करण्यासाठी कारणे किंवा आधार या संदर्भात शिवसेनेच्या घटनेमध्ये कुठलीही तरतूद नाही हे खरे आहे का?


प्रभू - हो


जेठमलानी - पक्षाच्या कोणत्याही सदस्याने उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेशी असहमती दाखवणे म्हणजे पक्षविरोधी कार्यवाही का?


प्रभू -  शिवसेनेच्या घटनेत अपात्रता याचिका दाखल करण्यासंदर्भात तरतूद नाही. 


जेठमलानी - जिथपर्यंत विधीमंडळ पक्षाचा संबंध आहे तिथपर्यंत सर्व निर्णय हे विधीमंडळ पक्षाच्या बहुमताने घेतले जातात. त्या प्रकरणात शिवसेना राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसतो


प्रभू - हे खोटे आहे. 


जेठमलानी - शिवसेना पक्षाची घटना शिवसेनेला तिच्या विचाराशी विरोधी असलेल्या पक्षाशी युती करण्याची अनुमती देते का?


प्रभू - हो.


जेठमलानी - शिवसेना नेत्यांनी बहुमताने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय घेतला की आपण शिवसेना पक्षाच्या विरोधी विचार असलेल्या पक्षाशी युती तोडावी? 


प्रभू - हे खोटं आहे.


जेठमलानी  - कथित जानेवारी 2013 मध्ये पक्षांतर निवडणुकांमध्ये आपण मतदान केलं होतं का ?


प्रभू - हो मी मतदान केलं होतं.


जेठमलानी - जानेवारी 2013 जे पक्षांतर्गत निवडणूक झाली त्यात तुम्ही मतदान केलच नाही. कारण तुम्ही मतदानासाठी पात्र नव्हता. अशी निवडणूक झाली नाही.


प्रभू - हे खोटं आहे.


जेठमलानी - तुमचं मतदान केल्याचा विधान हे प्रतिज्ञापत्रमधील विधानाच्या उलट आहे. कारण तुम्ही त्यात असं म्हटलं होतात की हे बिनविरोध निवडून आले होते. 


प्रभू- हे खोटं आहे.


जेठमलानी - 2013 मध्ये प्रतिनिधी सभेमध्ये होतात का? 


प्रभू - त्या काळात मी मुंबईचा महापौर होतो अथवा माजी महापौर होतो. पण मी प्रतिनिधी सभेचा सदस्यसुद्धा होतो आणि मी मतदान केलं. 


जेठमलानी - 2013 साली जी शिवसेना पक्षाची घटना अस्तित्वात होती. त्यामध्ये महापौर म्हणून पक्षाच्या प्रतिनिधी सभेचा तुम्ही सदस्य नव्हता. त्यामुळे तुम्हाला मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता. त्यामुळे तुम्ही या सभेत मतदान केले नाही?


प्रभू - हे खोटं आहे.


जेठमलानी - 2018 ते 2023 दरम्यान शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत?


प्रभू - हे खोटं आहे.


जेठमलानी - शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुखपदी झालेली उद्धव ठाकरे यांची निवड ही वैध नाही. कारण सेनेची घटना अशा प्रकारच्या निवडीला परवानगी देत नाही. 


प्रभू - हे खोटं आहे.


ही बातमी वाचा: