जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची उद्या जालना (Jalna) शहरात भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी तब्बल 140 एकरवर तयारी करण्यात आली आहे. तसेच 20 हजार दुचाकीच्या माध्यामतून रॅली काढली जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या या सभेला जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, जालन्यातील या सभेपूर्वी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. एक व्हिडिओ जारी करत त्यांनी हे आवाहन केले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी या व्हिडिओत बोलतांना म्हटले आहे की, “उद्या 1 डिसेंबर रोजी जालना शहरात मराठा समाजाची सभा होत आहे. या सभेतून आपल्याला संपूर्ण राज्याला एक आदर्श द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे. उद्या होणारा कार्यक्रम आणि दुचाकी रॅली एकदम शांततेत झाली पाहिजे. मराठा समाजाचे आंदोलन शांततेत असतांना देखील काही लोकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमचे आंदोलन शांततेतच होताच असा शांतीचा संदेश या राज्याला द्यायचा आहे. त्यामुळे जालना येथे उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वच बांधवांनी शांततेत सहभागी व्हावेत. हे राज्य आपल्याला शांत ठेवायचं आहे. काही लोकांची इच्छा आहे की, राज्य अशांत झाले पाहिजे. पण आरक्षणासोबतच राज्य देखील शांत राहिले पाहिजे असे मराठ्यांचं स्वप्न आहे. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की, उद्याच्या रॅलीत येतांना शांततेत सहभागी व्हावे, आणि शांततेतच परत आपल्या गावी जायचे असल्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
वाहतुकीत बदल...
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना शहरातील पांजरपोळ मैदान येथे उद्या (1 डिसेंबर) रोजी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाचे नागरीक छत्रपती संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी एकत्र येवून मोटार सायकल रॅली काढणार आहेत. तरी, या मोटार सायकल रॅलीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि वाहतुकीचे नियमन व नियंत्रण होणे गरजेचे आहे. याकरिता खालील मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, असे आदेश पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जारी केले आहेत.
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन...
- छत्रपती संभाजी नगरकडुन जालना मोतीबाग बायपास रोडने अंबड, घनसावंगी व मंठा कडे जाणारी वाहतुक ही ग्रेडर टी पॉईन्ट, बायपास रोड, कन्हैया नगर, नाव्हा चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. (मोटार सायकल रॅली छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासुन समोर गेल्यावर ग्रेडर टी पॉईन्ट पासुन बायपास रोड, कन्हैया नगर, नाव्हा चौफुली, मार्ग नाव्हा मंठा, अंबड चौफुलीकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येऊन ती वाहतुक पुर्ववत सिटीझन टी पॉईन्ट, मोतीबाग मार्गे अंबड - मंठा, नाव्हा - देऊळगावराजा कडे जाईल व येईल.)
- नुतन वसाहत, शनि मंदीर, मार्ग नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल.
- रेल्वे स्टेशन कडुन गांधी चमन, मंमादेवी मार्गे नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल.
- गणपती गल्ली, दिपक हॉस्पिटल, माळीपुराकडुन येणारी व गांधी चमन मार्गे नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही मोटार सायकल रॅली पुढे जाई पर्यंत थांबविण्यात येईल व मोटार सायकल रॅली पुढे गेल्यावर शनि मंदीर किंवा रेल्वे स्टेशन मार्गे अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल.
- बसस्थानक, सिंधी बाजार, सदर बाजार, बडी सडक परीसरातुन येणारी व जुना जालना शहरात जाणारी वाहतुक ही जिजामाता प्रवेशद्वार, मंठा चौफुली, अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल.
- मंगळ बाजार, गोल मस्जिद, चमडा बाजार, पंचमुखी महादेव मंदिर या परिसरातील वाहतुक सुभाष चौक मार्गे जुना जालना शहरात जाणारी वाहतुक ही राजमहेल टॉकीज समोरील पुलावरुन,ग्लोबल गुरुकुल शाळा, बायपास रोड, अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल.
- संभाजीनगर भागातून बसस्थानक मार्गे सदर बाजार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मंठा चौफुलीकडे जाणारी वाहतुक ही गोल्डन जुब्ली स्कुल, संतोषी माता रोड, विवेकानंद हॉस्पिटल, जिजामाता प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल.
- सिटीजन पॉईन्ट, दुःखी नगर, रामतिर्थ भागातून बसस्थानक मार्गे शहरात येणारी वाहतुक ही भोकरदन नाका येथे मोटार सायकल रॅली नवीन मोंढा रोडकडे पास होईपर्यंत थांबविण्यात येईल व नंतर पुर्ववत भोकरदन नाका बसस्थानक मार्गे वाहतुक सुरु करण्यात येईल.
- हे आदेश 1 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून मोटार सायकल रॅली संपेपर्यत अंमलात राहील.
इतर महत्वाच्या बातम्या: