मोनू शर्मा (बरना, जि. कुरुक्षेत्र, हरियाणा), दीपक (रा. लिधौरा एवनी, जि. झाशी, उत्तरप्रदेश) , मोहम्मद गुड (रा. बाकरपूर, जि. मुंगेर, बिहार) अशी या मुलांची नावे आहेत. त्यापैकी मोनू हा पाच वर्षांपासून हरवला होता. चुकून रेल्वेने प्रवास करत तो हरियाणातून मुंबईला पोहोचला होता. दीपक मागच्या आठवड्यातच उत्तरप्रदेशातून घरातून पळून रेल्वेने भुसावळला पोहोचला. पोलिसांना सापडल्यानंतर त्यांना पुनर्वसनासाठी गतिमंद बालगृहात दाखल करण्यात आले. तिथे प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून तिघांचे आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न झाला.
त्यावेळी या तिघा मुलांचे आधार कार्ड यापूर्वीच काढल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांचा आधार डेटा मिळविण्यासाठी त्यांना मुंबई येथे आधार कार्डच्या प्रादेशिक कार्यालयात नेले असता त्यांचे आधार कार्ड हाती आले. आधार कार्डमुळे त्यांचे नाव, पत्ता देखील मिळाला. त्यानुसार बालकल्याण समिती आणि बालगृहाने मुलांच्या पालकांना संपर्क साधून त्यांची मुलं सुखरुप असल्याची माहिती दिली.
मुलांचे पालक त्यांना घेण्यासाठी धुळ्यात आले होते. जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांच्यासमोर मुलांची आणि पालकांची ओळख परेड झाली. तसेच सर्व कागदपत्रांची तपासणी, पूर्तता करण्यात आली. सर्व खातरजमा झाल्यावर मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. जुजबी माहिती, प्रयत्नांची शिकस्त यामुळेच त्या मुलांच्या आई-वडिलांपर्यंत पोहचण्यास प्रशासनाला यश आलं आहे. पालकांना बऱ्याच वर्षांनंतर बघितल्यानंतर या गतिमंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद बघावयास मिळाला. बऱ्याच वर्षांनंतर घरी जाण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.