धुळे : धुळे महानगरपालिकेच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे 164 उमेदवारांना पुढील तीन वर्षे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास अपात्र अर्थात अनर्हतेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केली आहे. त्यात धुळे शहराचे एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शहा व तसेच भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांसह काही माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे. ही अपात्रता आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच 6 फेब्रुवारी 2020 पासून लागू करण्यात आली आहे . 6 फेब्रुवारी 2020 ला हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

धुळे महानगर पालिकेची डिसेंबर 2018 मध्ये निवडणूक झाली. यासाठी 356 उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यात सादर करायचा होता. त्यानुसार 167 उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. या उमेदवारांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे नोटीस बजावून खुलासा सादर करण्याची मुदत दिली होती. त्यासाठी वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. यात 164 जणांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मनपा कलम 10 (1 ई) अन्वये 164 जणांवर अनर्हतेची (अपात्र ) कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधितांना सदस्य म्हणून निवडणुकीस उभे राहण्यास तीन वर्षासाठी अनर्ह (अपात्र ) केले आहे.

Special Report | भंडाऱ्यातल्या मिरच्या दुबईच्या बाजारात, पाच मित्रांच्या स्टार्टअपमुळे शेतकरी सुखात | ABP Majha


धुळे महानगरपालिका निवडणुकीत विद्यमान आमदार फारुख शहा यांनी प्रभाग क्रमांक 13 अ मधून उमेदवारी केली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भाजपाचे सोनल शिंदे हे सध्या स्वीकृत नगरसेवक म्हणून आहे. अनर्हतेची कारवाई झालेल्यांमध्ये तत्कालीन महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती माधुरी अजळकर, माजी सभागृह नेता अरशद शेख, माजी नगरसेवक रमेश बोरसे यांच्यासह इतरांचा यात समावेश आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे धुळ्यात राजकीय गोटात खळबळ माजली आहे. या संदर्भात धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शाह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण मुंबईत एका बैठकीत व्यस्त असल्याचं सांगत अधिक बोलण्याचं टाळलं आहे.

संबंधित बातम्या: 

धुळे महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी