शिर्डी : महाराष्ट्रासह परराज्य आणि परदेशातूनही असंख्य भाविकांची रिघ शिर्डीतील साईमंदिरात सुरुच असते. मागील काही महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वगळला तर, वर्षाचे बाराही महिने इथं कमालीची गर्दी पाहायला मिळते. सध्याही लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर मंदिरं पुन्हा उघडण्याची परवानगी शासनानं दिली आणि अनेकांचे पाय (shirdi) शिर्डीकडे वळले.
ख्रिसमस (Christmas 2020), नववर्ष (new year) अशी सलगची सुट्टी आल्यामुळंही इथं तोबा गर्दी आहे. पण, यातच काही भाविकांना मात्र विचित्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. परराज्यातील काही महिला भाविकांसमोर उभी राहिलेली ही अडचण म्हणजे साईंच्या दरबारी काक़ड आरतीसाठी उपस्थिती लावण्यासाठी मंदिराकडून करण्यात आलेल्या 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी.
साईबाबांच्या काकड आरतीसाठी तब्बल 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी केल्याचा आरोप काही महिला भााविकांनी केला. परराज्यातून आलेल्या महिला भाविकांच्या या आरोपामुळं एकच खळबळही माजली.
महिला भाविकांच्या या आरोपासंदर्भात 'एबीपी माझा'नं मंदिर प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. ज्यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. पण, अशा तक्रारी आल्या असल्यास आम्ही त्याची चौकशी करु असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
काकड आरती संदर्भातील देणगीच्या मागणीप्रकरणी शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त म्हणतात...
शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी याबाबतची पहिली प्रतिक्रिया दिली. 'जो भक्त देणगी देतो त्या भक्ताला मंदिर संस्थानच्या वतीनं दर्शन आणि आरतीची व्यस्था केली जाते. हा बऱ्याच वर्षांपूर्वीपासूनचा निर्णय़ आहे. पण, पैसे दिल्यानंतर आरतीचा पास मिळेल अशी कोणतीही मागणी कधी करण्यात आलेली नाही. सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं आरतीचे पास देण्यात येत आहेत. पण, कोरोनाच्या महामारीमुळं पास वितरणाची संख्या कमी ठेवण्यात आली आहे', असं ते म्हणाले. पण, तरीही पैशांची मागणी करत पास देण्याची अट ठेवल्याची घटना घडल्यास त्याबाबत चौकशी करण्याबाबतचं निवेदन देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
धक्कादायक! सांताक्लॉज आला, कोरोना देऊन गेला
कोरोना काळातही मंदिरानं केली ही व्यवस्था....
कोरोनाच्या संकटताळातही मंदिर सुरु करण्यात आलं असून, शिर्डी येथे येणाऱ्या जवळपास 12-15 हजार भाविकांना दर्शन कसं घेता येईल यावर मंदिर प्रशासनानं भर दिला आहे. शिवाय विविध वेळांमध्ये होणाऱ्या आरत्यांसाठीही ठराविक संख्येनं भाविकांची उपस्थिती असण्याकडे मंदिर प्रशासनाचा कल असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या धर्तीवर दर्शनासाठी आणि आरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं पास घेण्याचं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं आहे.
परराज्यातील महिलांची तक्रार काय?
दिल्लीतील काही महिलांना मागील पंधरा दिवसांपासून ऑनलाईन पास उपलब्ध होत नव्हता. त्याकरता त्यांनी मंदिराशी संलग्न यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काकड आरतीच्या पासची विचारणा केली असता थेट देणगी स्वरुपात पैशांचीच मागणी करण्यात आल्याचा आरोप या महिलांनी केला.