शिर्डी : महाराष्ट्र, भारत आणि सातासमुद्रापार परदेशातील भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या (Shirdi) शिर्डी येथील साईबाबा मंदिरात भाविकांची रिघ सुरुच असते. अनेक मैलांचा प्रवास करत भाविक श्रद्धोपोटी या मंदिराची वाट धरतात. मुख्य म्हणजे सध्याची परिस्थिती आणि कोरोनाचं संकट असूनही सलगच्या सुट्टीमुळं अनेक भाविकांनी पुन्हा एकदा शिर्डीच्या साईबाबा मंदिरात येण्याला प्राधान्य दिलं.


शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला साईदरबारी काकड आरतीसाठी उपस्थित राहण्याची इच्छा असते. पण, इथं काकड आरतीसाठी तब्बल 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी केल्याचा आरोप काही महिला भााविकांनी केला आहे. परराज्यातून आलेल्या महिला भाविकांच्या या आरोपामुळं एकच खळबळ माजली आहे. महिला भाविकांच्या या आरोपासंदर्भात 'एबीपी माझा'नं मंदिर प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यांच्याकडून अद्यापही कोणतंच उत्तर देण्यात आलेलं नाही.


महिलांच्या आरोपात तथ्य़ असल्यास ही गंभीर बाब असल्याचं लक्षात येत आहे. देवाच्या दारी येणाऱ्या भक्तांकडे अशी मागणी करत भक्तीला पैशांच्या तराजूत तोलणारे दलाल कोण हाच प्रश्न आता इथं उपस्थित होत आहे.


ऑनलाईन परीक्षेसाठी काहीकाळ मंगलाष्टके थांबली, पेपर सोडवूनच नवरी बोहल्यावर चढली


'आम्हाला ऑनलाईन पास मिळाला नाही. त्यावर 25 हजार रुपये द्या आणि काकड आरतीला या असं आम्हाला सांगण्यात आलं. ऑनलाईनही पाससाठी प्रयत्न केले पण, ते शक्य होऊ शकलं नाही', अशी वस्तूस्थिती मांडत श्रीमंतांनाच दर्शनाची मुभा, गरीबांचं काय असा संतप्त सवाल सदर महिला भाविकांनी उपस्थित केला.


साईबाबा मंदिराकडून काकड आरतीसाठी करण्यात आलेल्या हजारोंच्या देणगीची मागणी ऐकून भाविकांनी तीव्र संताप व्यक्त करत हा हे व्यवसायिकरणच सुरु झाल्याचा आरोप मंदिर प्रशासनावर लगावत येथील व्यवस्थेवर निशाणा साधला. शिर्डीतील साईबाबा मंदिराकडे येणाऱ्यांचा ओघ, भक्तांना येणारी प्रचिती या साऱ्यामध्ये भोळ्याभाबड्या भक्तांना आता या नव्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याची निराशाजनक बाब सध्या समोर येत आहे.