यवतमाळ : कोरोनाव्हायरसमुळे सगळ्याच गोष्टींवर बंधनं आली आहेत. मग शिक्षण असो वा लग्नसमारंभासारखे कार्यक्रम. सध्या लग्नसराईचा मोसम आहे. परंतु परीक्षा सुरु आहेत. शुभकार्यांसाठी मुहूर्त अतिशय महत्त्वाचे समजले जातात. परंतु यवतमाळमध्ये ऑनलाईनसाठी परीक्षेसाठी लग्नाचा मुहूर्त काहीकाळ पुढे ढकलण्यात आला. ऑनलाईन पेपर सोडवून मगच नवरी बोहल्यावर चढली.


यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील सारीका अरुण शिखरे हिचा शुभविवाह अमरावती येथील निलेश साबळे यांच्यासोबत ठरला होता. दोन्ही बाजूंच्या वऱ्हाड्यासंह पाहुणे मंडळी मंगलाष्टकासाठी सज्ज होती. अशातच उपवर नवरी काही वेळातच आपली ऑनलाईन परीक्षा असल्याचं समजलं. यानंतर नवरीने नवरदेवाला निरोप पाठवला की बीएससी अॅग्रो सहकार विषयाचा 2 ते 2.40 पर्यंत ऑनलाईन पेपर आहे. ते सोडवून आपण लग्न करु. नवरदेवाने त्यांच्याकडील मंडळींना ही माहिती दिली आणि संपूर्ण विवाह मंडपात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. दोन्हीकडील मंडळीसह उपस्थित पाहुणे मंडळीने आधी परीक्षा आणि नंतर लग्न करण्यास संमती दिली. नवरीने आनंदाने आपल्या वर्गमैत्रिणीसोबत ऑनलाईन पेपर सोडवला आणि नंतरच ती बोहल्यावर चढली. मंगलाष्टके होऊन विवाह पार पडला. 25 डिसेंबर रोजी हे लग्न पार पडलं.


ऑनलाईन पेपरकरता मंगलाष्टके थांबवून दोन्हीकडच्या वऱ्हाडासह पाहुणे मंडळीने शिक्षणाला प्राध्यान्य दिल्याबद्दल शिखरे आणि साबळे परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.