Shirdi Kopargaon Crime News: भंगार गोळा करण्याच्या वादातून एका परप्रांतियाने भिक्षेकरी महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना कोपरगावमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी रात्री मृतदेहाशेजारी झोपून होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सकाळी रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील(Kopargaon News) शिंगणापूर शिवारात भिक्षेकरी महिला मयत सोनू कुमारी आणि मूळचा बिहार येथील असणारा आरोपी निसार खान यांचे भंगार आणि प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यावरून वाद झाला होते. त्याचाच राग मनात धरून निसार खान याने रात्रीच्या सुमारास सोनू कुमारीची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर निसारनं सोनू कुमारीचा मृतदेह एका व्यापारी संकुलातील दुकानासमोर ओढत नेला आणि आरोपी बराच वेळ मृतदेहाशेजारी झोपून राहिला.
जाग आल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. दरम्यान सकाळी दुकानाचा मालक दुकान उघडण्यासाठी आला असता त्याने मृतदेह पाहिला आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. आरोपीचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध सुरू केला.
पोलिसांनी काही तासातच केलं मोठ्या शिताफीने आरोपीला जेरबंद
आरोपी निसार खान रेल्वेने दुसरीकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी काही तासातच मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद केले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने यापूर्वीही असे काही कृत्य केले आहेत का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
कोपरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितलं की, आम्ही तातडीने पथक तयार केलं आणि त्यांनी चौकशी सुरु केली. घटना समोर आल्यानंतर आम्ही रेल्वे स्थानक परिसर आणि संबंधित परिसराची तपासणी केली आणि आरोपीला ताब्यात घेतलं. गुन्ह्यानंतर तातडीनं कार्यवाही केल्यामुळं आरोपी सापडू शकला. यातील आरोपी आणि मृताचा दोघांचाही कुठलाही पत्ता नाही. त्यामुळं आरोपी जर आता पळून गेला असता तर कदाचित तो सापडू शकला नसता. आता आरोपीला पकडून त्याला पोलिस कस्टडी घेतली आहे. त्याने आधी अशा प्रकारचा काही गुन्हा केला आहे का याबाबत त्याची तपासणी केली जाईल, असं पोलिस निरीक्षक देसले यांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या