PFI Latest Updates: राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) केलेल्या कारवाईत महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. महाराष्ट्र एटीएसला औरंगाबादमधून अटक केलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मराठवाड्यात शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. 


काही दिवसांपूर्वी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर तपास यंत्रणांनी देशभरात छापेमारी केली होती. दोन टप्प्यात केलेल्या या कारवाईत पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्याशिवाय, त्यांच्या कार्यलयातून महत्त्वाचे दस्ताऐवजही जप्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली. एनआयएने केलेल्या कारवाईत महाराष्ट्र एटीएसचा सहभाग होता. एटीएसच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 


एटीएसने अटक केलेल्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादेतील पडेगाव, नारेगावसह बीड आणि जालना येथे शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसला आढळून आले आहे. हे प्रशिक्षण एका बंद शेडमध्ये देण्यात येत होते. त्याशिवाय, अटकेत असलेल्या आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून अनेक मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा एटीएसने न्यायालयात केला आहे.  


रविवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (वय 37, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील ( वय 28, रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान ( वय 29, रा. जुना बायजीपुरा), अब्दुल हादी अब्दुल रऊफ ( वय 32, रा. रहेमान गंज) आणि शेख नासेर शेख साबेर ( वय 37, रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. 
तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त करण्यात आले होते. त्यातून एटीएसला महत्त्वाच्या बाबी समजल्या आहेत. 


एटीएसच्या तपासानुसार, अब्दुल हादी अब्दुल रऊफ हा महत्त्वाचा आरोपी आहे. त्याच्याकडे 19 पानांचे हस्तलिखित सापडले आहे. त्यामुळे एटीएसला तपासात मदत होत आहे. भारताला 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनविण्यासाठी पीएफआयने प्रत्येक सदस्याला 'मिशन' ठरवून दिले होते. त्यानुसार, आर्थिक निधी गोळा करणे, खासगी ट्रस्ट स्थापन करणे, जिहादी प्रशिक्षण देणे अशा बाबींचा उल्लेख आहे. आरोपी अब्दुल हादी अब्दुल रऊफ याचे स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेत खाते असल्याचे समोर आले आहे. 


पीएफआयचा महाराष्ट्र अध्यक्ष शेख नासेर याच्या आदेशानुसार, सर्व आरोपी काम करत असल्याचे एटीएसने म्हटले. एनआयने शेख नासेरचे बँक खाते गोठवले आहे. त्याच्या खात्यात एक लाख 80 हजार रुपये आढळले. शेख नासेरने पीएफआयच्या कामासाठी दरमहा सहा हजार रुपयांचे मानधन मिळत असल्याचे कबूल केले. त्याच्या खात्यात एक लाख 80 रुपये आढळून आले. 


आरोपी परवेझ खान याने औरंगाबादेतील जटवाडा रोड, पडेगाव आणि नारेगाव येथे निर्जनस्थळी बंद शेडमध्ये दहशतवादी प्रशिक्षण दिल्याचा दावा एटीएसने न्यायलयात केला आहे.  मडगाव येथे 15 सप्टेंबर रोजी झालेल्या पीएफआयच्या बैठकीत तो हजर होता असे एटीएसने कोर्टात सांगितले आहे. त्या बैठकीत तपास यंत्रणांच्या कारवाईची चाहूल लागल्याने मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट करण्याचा निरोप देण्यात आला होता, असा दावा एटीएसने कोर्टात केला.