मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच आता विधानसभेमध्ये सुद्धा राडा झाला आहे. विधिमंडळाचे लाॅबीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडल्याने एकच खळबळ उडाली. मंत्री दादा भुसे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली. यामुळे आता विधानसभेमध्ये सुद्धा पोलीस लावण्याची वेळ आल्याची खोचक प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर हा वाद गेल्यानंतर त्यांनी महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना एकत्र घेऊन कार्यालयामध्ये गेले. 



शंभूराज देसाई म्हणतात, धक्काबुक्कीचा पुरावा काय? 


दरम्यान, हा वाद झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांकडून वाद झालाच नाहीत, असा दावा करण्यात आला. मध्यस्थीनंतर धावलेल्या शंभूराज देसाई यांनी हा वाद झाल्याचा पुरावा काय? असा दावा केला. ते म्हणाले की, बोलताना कोणाचा आवाज वाटलं म्हणजे वाद झाला असं नाही. योगायोगाने मी तिथे होतो. मला ते जेव्हा समजलं उंच आवाजामध्ये सुरू आहे म्हणून दोघांनाही घेऊन गेलो. लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार महोदय आणि त्यांचा विषय मला सांगितला आणि आमदार साहेबांचं काम कसे मार्गी लावता येईल हे पाहिलं. एकमेकांच्या अंगावर जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही. 


ते पुढे म्हणाले की, माध्यमांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे. माध्यम प्रतिनिधी काही आतमध्ये येतात. त्यांनी सुद्धा खात्री केल्याशिवाय अशी बातमी चालवणं योग्य नाही. जर आमदारांना विचारला असता, संबंधित मंत्री महोदयांना विचारलं असतं तर ते मी सांगितलं. मी सभागृहामध्ये होतो. माझं सभागृहामध्ये कामकाज आहे, पण जेव्हा मला हे समजलं तेव्हा सभागृहातील कामकाजातून बाहेर येऊन आपल्याला ही वस्तुस्थिती सांगत आहे, असे ते म्हणाले. 


मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया टाळली 


दरम्यान, वाद झाल्याचे कानावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिडचिड झाल्याचे दिसून आले. त्यांनी अरे काय तर काय विचारताय? अधिवेशनातील कामाचे विचारा, अशी प्रतिक्रिया देत वादावर भाष्य केलं नाही. दुसरीकडे, शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा प्रांगणाला आखाडा केल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी सडकून टीका केली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या