Marriage Ceremony in Cemetery : विवाह सोहळा म्हटले की मोठा तामझाम, भला मोठा मंगल कार्यालय असावा अशी अनेकांची इच्छा असेत. मात्र, परभणीत (Parbhani) एक लग्न सोहळा (Marriage Ceremony) चक्क स्मशानभूमीत पार पडला आहे. स्मशानभूमीमध्ये 300 ते 400 वऱ्हाडींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पूर्ण झाला. विशेष म्हणजे ज्या स्मशानभूमीमध्ये हा लग्न सोहळा पार पडला, त्या स्मशानभूमीमध्ये (Cemetery) स्मशान जोगी म्हणून मुलीचे काका काम करतात. स्मशानभूमीबद्दल आजही समाजात भीती आहे, हीच भीती दूर व्हावी या उद्देशाने अंकुश जाधव यांनी आपल्या मुलीचा विवाह थेट स्मशानभूमीत लावला. 


परभणी शहरातील खानापूर फाटा या स्मशानभूमीत स्मशान जोगी म्हणून अंकुश जाधव हे तीस वर्षापासून काम करतात. त्यांचे बंधू गंगाधर जाधव हेही शहरातील खंडोबा बाजार परिसरातील स्मशानभूमीमध्ये स्मशान जोगी आहेत. अंकुश जाधव यांची मुलगी लक्ष्मी जाधव हिचा विवाह मागच्या वर्षी साईनाथ मिरेवाड यांच्याशी निश्चित झाला होता. या सोहळ्याचे विवाह स्थळ मंगल कार्यालय किंवा अन्य ठिकाणी न ठेवण्यात येता त्यांनी थेट खंडोबा बाजार परिसरात असलेल्या स्मशानभूमीमध्ये ठेवले. विशेष म्हणजे 300 ते 400 वऱ्हाडींच्या उपस्थितीत गुरुवारी (29 फेब्रुवारी) रोजी  हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. स्मशानभूमी बाबत असलेली समाजातील भीती आणि वेगवेगळे तर्क वितर्क दूर करण्यासाठी हा विवाह सोहळा आपण इथेच लावला असं अंकुश जाधव यांनी सांगितला आहे.


आधी अंत्यविधी पूर्ण केला, मग लावला सोहळा


गुरुवारी अंकुश जाधव यांच्या मुलीचा लग्न सोहळा शहरातील खंडोबा बाजार परिसरातील स्मशानभूमीमध्ये आयोजित करण्यात आला होता. लग्नाची सर्व तयारी झाली होती, वऱ्हाड आणि पाहुणे देखील पोहचले होते. मात्र, लग्न सोहळ्यापूर्वीच याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणण्यात आला होता. त्यामळे आधी मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पुढील विवाह सोहळा पार पाडण्यात आला. तर, नवरदेव साईनाथ मिरेवाड हे देखल पुणे येथे स्मशान जोगी म्हणूनच काम पाहतात. त्यामुळे, स्मशानभूमी बाबत असलेली समाजातील भीती दूर करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.  


लग्नाची परिसरात चर्चा...


सध्या लग्नाचा सीजन असून रोज हजारो विवाह सोहळे पार पडत आहेत. अशात परभणी जिल्ह्यात स्मशानभूमीत झालेल्या विवाह सोहळ्याची मात्र सर्वत्र चर्चा आहे. अनेकजण लग्नासाठी व्हीआयपी मंगल कार्यालय निवडतात. त्यासाठी हजारो, लाखो रुपये देखील खर्च केले जातात. असे असतांना स्मशानभूमीत झालेल्या लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. स्मशानभूमीत लग्न लागत असल्याने अनेकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती. तर, जाधव कुटुंबाच्या या भुमिकेचं आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी: महादेव जानकर परभणीतून लोकसभा निवडणूक लढवणार; महायुतीची अडचण वाढणार?