नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा या महिन्यात जाहीर होऊ शकतात. सर्वच पक्षांनी आपले पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे. भाजप आज शुक्रवारी (1 मार्च) दुपारपर्यंत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. या यादीत 100 हून अधिक नावे समाविष्ट असण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाकडून पहिल्या यादीत भाजपच्या दिग्गजांना तिकीट दिले जाऊ शकते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश असू शकतो.


भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज पहाटे तीन वाजून 20 मिनिटांपर्यंत तब्बल चार तास बैठक झाली. यामध्ये काही प्रमुख जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. रात्री 10.50 च्या सुमारास सुरू झालेली ही सभा पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी संपली. या चार तासात भाजपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत विविध राज्यांतील लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली. 


कोणत्या राज्यांच्या जागांवर चर्चा झाली?


भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, उत्तराखंड, गुजरात, आसाम, झारखंड, तामिळनाडू, ओडिशा, मणिपूर, दिल्ली, जम्मू-काश्मीर, पुद्दुचेरी आणि अंदमानच्या जागांवर चर्चा केली. मात्र ईशान्येकडील राज्याच्या जागांवर चर्चा झाली नाही. अशा प्रकारे एकूण 14 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभेच्या जागांवर मंथन झाले आहे.


महाराष्ट्रातील एकाही जागेवर चर्चा नाही!


दरम्यान, उमेदवारी निश्चितीसाठी झालेल्या पहिल्याच बैठकीत सर्वाधिक संवेदनशील झालेल्या महाराष्ट्रातील एकाही जागेची  चर्चा झाली नाही. त्यामुळे पहिल्या यादीत महाराष्ट्रातून कोणाचे नाव येणार का? याची उत्सुकता असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पहिल्या यादी असणार का? याचीही उत्सुकता असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीसाठी हजर होते. 


पहिल्या यादीत कोणत्या दिग्गजांना तिकीट मिळू शकते?


भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पक्षातील दिग्गज नेत्यांचा समावेश असू शकतो. त्यात बहुतांश केंद्रीय मंत्र्यांची नावे असू शकतात. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात दिसू शकतात. लखनौमधून राजनाथ सिंह, गांधीनगरमधून अमित शहा, अमेठीतून स्मृती इराणी, सबलपूरमधून धर्मेंद्र प्रधान, ग्वाल्हेरमधून ज्योतिरादित्य सिंधिया, विदिशामधून शिवराज सिंह चौहान, पुरीमधून संबित पात्रा यांना तिकीट दिले जाऊ शकते.


याशिवाय भिवानी बल्लभगडमधून भूपेंद्र यादव, दिब्रुगढमधून सर्बानंद सोनोवाल, राजौरी-अनंतनागमधून रवींद्र रैना, कोटामधून ओम बिर्ला, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी आणि पश्चिम दिल्लीतून परवेश वर्मा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.


इतर महत्वाच्या बातम्या